सणबूर : ‘गेली १८ वर्षे संघर्षात व अनेक प्रश्न प्रलंबित असलेले वांग-मराठवाडी धरणाचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या धरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करतो,’ असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन हवेत विरले आहे.जानेवारी महिन्यात पालकमंत्री वांग-मराठवाडी धरणावर आले होते. दुपारी ३ वाजता येणारे मंत्री रात्री ८.३० वाजता आले. तोपर्यंत धरणग्रस्त आपले प्रश्न सुटतील, या आशेने बायकामुलांसह धरणाच्या ठिकाणी वाट बघत बसले होते. मंत्र्यांचे आगमन होताच अनेक वयोवृद्ध लोकांनी १८ वर्षे आपण भोगत असलेल्या हालअपेष्टा सांगितल्या. आम्हाला जगणं कठीण झालंय. कसायला शेती नाही. प्यायला पाणी नाही. आम्ही उदरनिर्वाह कसा चालवायचा. आम्हाला कोणी वाली नाही का ?, असे अनेक प्रश्न मंत्र्यांपुढे मांडले. पालकमंत्र्यांनी धरणग्रस्तांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. यावेळी धरणाचे ठेकेदार तसेच आमदार शंभूराज देसाई उपस्थित होते. त्यावेळी मंत्री शिवतारे यांनी ‘धरणाचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण करतो,’ असे आश्वासन दिले. मात्र, सहा महिने झाले तरी वांगच्या धरणाचा एक दगड सुध्दा हललेला नाही.धरणाचे बांधकाम तर लांबच, सहा महिन्यांपूर्वी आलेले पालकमंत्री पुन्हा पाटण तालुक्यात फिरकलेच नाहीत. (वार्ताहर) रस्त्यांची अवस्था दयनीय...ढेबेवाडकडून जिंतीकडे जाणारा मुख्य रस्ता वांग-मराठवाडी धरणाच्या बुडित क्षेत्रात जात असल्याने त्यावर १८ वर्षांपासून शासनाने निधी कधीच टाकलेला नाही. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे.
वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचा पालकमंत्र्यांना विसर
By admin | Published: June 25, 2015 9:33 PM