कोकरुड : गेल्या एक महिन्यापासून गुढे-पाचगणी पठारासह सत्तावीस गावातील डोंगरांना आगी लागत आहेत. या सर्व आगी लावल्या जात आहेत की लागत आहेत हे वनविभागालाही अद्याप समजले नसले तरी हजारो शेतकऱ्यांचे नुकसान आणि औषधी वनस्पती जळून खाक होत आहेत.
शिराळा तालुक्यातील गुढे-पाचगणीसह पाटण, कराड तालुक्यातील डोंगर पठारावर पवनचक्की प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. विविध कंपन्यांचे शेकडो पवनचक्की टॉवर उभे असून या ठिकाणी तयार होणारी वीज शिराळा, पाटण आणि कराड तालुक्यातील महावितरणला देण्यात आली आहे. पठारावरील वीज डोंगर कपारीमधून खाली वीज वितरण केंद्रापर्यंत गेल्याने विद्युत वाहक तारांचे घर्षण होऊन डोंगर पठारावर त्यांच्या ठिणग्या पडून ही आग लागत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
या आगीत गुरांचा चारा, औषधी वनस्पती, छोटी-मोठी झाडे, प्राणी यांना इजा पोहोचत आहे. मात्र, या आगीशी आमचा काही संबंध नाही असे म्हणत महावितरण कंपनी आणि पवनचक्की कंपनी हात वर करीत आहेत.
सतत लागणाऱ्या आगीमुळे शिराळा तालुक्यातील बांबरवाडी, गुढे, मानेवाडी, पाचगणी, शिरसटवाडी, सावंतवाडी, रांजनवाडी, मेणी, येळापुर, शेडगेवाडी,नाठवडे, मोहरे, चरण, पणुब्रे वारुण, किनरेवाडी, चिंचेवाडी, काळुंद्रे, करुंगली, आरळा, मणदूर तर कराड तालुक्यातील लोहारवाडी, येळगाव, भरेवाडी, भुरभुशी, पाटण तालुक्यातील टेटमेवाडी, काळगाव,धनगरवाडा येथील डोंगरावरती जानेवारी महिन्यातच वणवे लागत आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
चाैकट
चाैकशीची मागणी
अगोदरच विविध संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बळीराजाला याही संकटाची झळ सोसावी लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि आगीच्या कारणांची चौकशी करून वनविभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
फोटो-२३कोकरुड४
फोटो ओळ : गुढे-पाचगणी पठारावर अशा पद्धतीने वारंवार आगी लागल्याने वने व शेतीचे नुकसान होत आहे.