लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनापूर्वीच्या गुढीपाडव्याशी तुलना करता यंदा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना एकूण ८६.५० कोटींचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ, घरबांधणी व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून यादिवशी नव्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेला कोरोनाने धक्का दिला आहे. वाहन क्षेत्र वगळता सराफ व इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय यंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. वाहन क्षेत्रातही फारसा उत्साह दिसून आला नाही. दुचाकीच्या पाडव्याच्या विक्रीत ८० टक्के, तर चारचाकीच्या विक्रीत ५० ते ६० टक्के घट दिसून आली. बुकिंग केलेली वाहने देण्यासही व्यावसायिकांना अडचणी आल्या. वाहनांची उपलब्धताही झाली नसल्यानेही फटका बसला आहे.
चौकट
कोणत्या क्षेत्राचे किती नुकसान
दुचाकी विक्री १४.५० कोटी
चारचाकी विक्री ३६ कोटी
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू २२ कोटी
सराफ बाजार १४ कोटी
एकूण ८६.५० कोटी
कोट
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीस यंदाही मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षांतील हे नुकसान चिंताजनक आहे. तरीही मागच्या वर्षीचा विचार केल्यास परिस्थिती बरी म्हणावी अशीच वाटते.
-श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक मोटर्स
कोट
इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायाला गुढीपाडव्यादिवशी सुमारे २२ ते २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दुकानेच बंद असल्याने मुहूर्तावरील खरेदी थांबली. दोन वर्षे ही परिस्थिती असल्याने व्यावसायिकांचा विचार शासनाने करायला हवा.
- विजय लड्डा, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक, सांगली
कोट
गुढीपाडव्याला होणारी उलाढाल थांबल्याने मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायात नव्याने कर्ज काढून आलेले व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. दुकाने बंद असली तरी देणी सुरूच आहेत.
- पंढरीनाथ माने, सचिव, सांगली सराफ समिती
चौकट
गुढीपाडवा सुनासुना जाण्याची चौथी वेळ
सराफ व्यावसायिकांचा गुढीपाडव्याचा सण सुनासुना जाण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये नगरपालिकेचा जकात ठेका रद्द करावा म्हणून सांगलीतील दुकाने ८ ते १० दिवस बंद होती. त्या काळातच गुढीपाडवा होता. त्यानंतर २०१६ मध्ये सोन्यावर अबकारी कर लागला होता. त्याविरोधात भारतातील सर्व सराफ, सुवर्णकार, गलाई दुकानदार यांनी ४२ दिवस बंद पाळला होता. तेव्हासुद्धा गुढीपाडवा होता. आता कोरोनासारख्या आपत्तीने सलग दोन वर्षे गुढीपाडवा सण सुनासुना गेला आहे.