सांगली : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन या संस्थेच्या वतीने स्पेस रिसर्च पेलोड क्युबस चॅलेंज २०२१ या उपक्रमात सहभागी महापालिकेच्या पाच शाळा, दहा विद्यार्थी आणि चार शिक्षकांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह विविध रेकॉर्ड बुकात नोंद झाली. तसे प्रमाणपत्रही त्यांना प्राप्त झाले आहे. रामेश्वरम (तमिळनाडू) येथे स्पेस रिसर्च पेलोड क्युबस चॅलेंज २०२१ उपक्रमाचे आयोजन केले होते. यात देशभरातून एक हजार विद्यार्थ्यांकडून शंभर लघू उपग्रह तयार करून अवकाशात सोडण्यात आले.महानगरपालिकेच्या पाच शाळेतील दहा विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघू उपग्रहाचे सात फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून अवकाशात सोडण्यात आले होते. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनचे समन्वयक दिनकर आदाटे, शिक्षण विभागाचे लेखापाल गजानन बुचडे, सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी महा अटल लॅबच्या धर्तीवर मनपा शाळेमध्ये प्रयोगशाळा निर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आयुक्त कापडणीस यांनी, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे यशात रूपांतर करून जागतिक पातळीवर सांगली महानगरपालिकेचा नावलौकिक घडविला आहे याचा अभिमान वाटतो असे सांगितले. याप्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी महापौर, आयुक्त नितीन कापडणीस, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनचे समन्वयक दिनकर आदाटे, शिक्षण विभागाचे लेखापाल गजानन बुचडे, सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे उपस्थित होते. मुख्याध्यापक राकेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तात्यासाहेब सौंदत्ते यांनी आभार मानले. भारत बंडगर व संदीप सातपुते यांनी नियोजन केले.
सहभागी विद्यार्थी व शिक्षक : विद्यार्थी - लखन हाके, ओंकार मगदूम, किशोरी मादीग, प्रतीक्षा मुडशी, योगेश कुरवलकर, दर्शन बुरांडे, साकीब सय्यद, समीर शेख, विजय हिरेमठ, राजू भंडारे,शिक्षक - संतोष पाटील, मांतेश कांबळे, कल्पना माळी, विशाल भोंडवे, अनिता पाटील, अशोक उंबरे, आश्विनी माळी, शैलजा कोरे, फराहसुलताना कुरेशी, नजमा मारुफ.