लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर: शहरामध्ये खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे करणारा सराईत गुंड गणेश उर्फ गजराज साईनाथ पाटील याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याखाली कारवाई करत वर्षभरासाठी त्याच्या मुसक्या आवळल्या. दोन महिन्यातील ही तिसरी कारवाई झाली आहे. त्याला स्थानबद्ध करण्याच्या पोलिसांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
गजराज पाटील याच्याविरुद्ध पोलिसात ६ गुन्ह्यांची नोंद आहे.अलीकडे त्याच्याकडून दहशत माजविण्याच्या प्रयत्नात वाढ झाली होती. त्यामुळे त्याच्या दहशतीला पायबंद घालण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याखाली एक वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याची सुनावणी झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ जानेवारीला या प्रस्तावाला मंजुरी दिली.
गुंड गजराज पाटील हा सध्या सांगलीच्या कारागृहात असल्याने त्याच्याविरुद्धच्या या स्थानबद्ध आदेशाची बजावणी पोलिसांनी तेथे जाऊन केली.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे,निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे,हवालदार दीपक ठोंबरे,अरुण पाटील,शरद जाधव,प्रशांत देसाई,आलमगीर लतीफ,अमोल भिंगारदिवे,उमाजी राजगे यांनी ही कारवाई केली.
कोट
या कारवाईच्या रडारवर शहरातील आणखी काही गुंड आहेत. गुंडगिरी, दहशत माजविणे, सावकारी, खंडणी मागणे असे प्रकार कोणाकडून होत असतील तर नागरिकांनी त्यांची माहिती द्यावी.या गुंडगिरीचा कायद्याच्या कक्षेत राहून बिमोड केला जाईल.-
नारायण देशमुख पोलीस निरीक्षक