सांगली : महापालिकेतील खाबूगिरीचे विभाग म्हणून गुंठेवारी व नगररचनाची ओळख तेथील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणखीनच गडद होत चालली आहे. कित्येक वर्षांपासून या विभागात ठाण मांडून बसलेल्या पाच कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी बदली केली होती. यातील काही कर्मचाऱ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. पण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. तसेच काहीजणांनी बदलीच्या जागी केवळ नावापुरतीच हजेरी लावून गुंठेवारीत अधिक रस दाखविण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर पारदर्शी कारभाराची हमी सांगलीकरांना दिली होती. पण त्यांच्या आश्वासनाला कर्मचाऱ्यांनीही हरताळ फासल्याचे दिसून येते. गेल्या सहा महिन्यांत दोन ते तीनजणांना लाच प्रकरणात अटक झाली. आता खाबुगिरीच्या विभागातून कर्मचाऱ्यांचा पाय निघता निघेना, असे दिसते. गुंठेवारी व नगररचना या दोन्ही विभागात वर्णी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. त्यात एकदा वर्णी लागल्यानंतर, तेथून पुन्हा बदली होऊ नये, यासाठी कर्मचारी पदाधिकाऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत प्रयत्न करीत असतात. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. मिरजेतील गुंठेवारी विभागात मानधनावर असलेल्या एका कर्मचाऱ्याची कुपवाडला बदली झाली. या कर्मचाऱ्याने कुपवाडमध्ये बसून मिरजेतील गुंठेवारीच्या फायली हलविल्या. त्याचे कारनामे अधिकच वाढल्याने त्याची मिरज पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली. पण त्याने पाणीपुरवठा विभागापेक्षा गुंठेवारीलाच अधिक प्राधान्य दिले आहे. आणखी एका मिरजेतील कर्मचाऱ्याची ड्रेनेज विभागाकडे बदली झाली आहे. पण अद्यापही त्याचा वावर गुंठेवारीतच आहे. सांगलीतील नगररचना विभागाकडील एका महिला कर्मचाऱ्याची मिरजेतील गुंठेवारी विभागात बदली करण्यात आली आहे. पण त्यांनी अद्याप नगररचना विभाग सोडलाच नसल्याचे सांगण्यात येते. सांगलीच्या गुंठेवारीकडील एकाची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकडे बदली झाली आहे. पण तोही अद्याप गुंठेवारीतच काम करतो आहे. नगररचनाकडील एका प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्याकडे सांगलीच्या गुंठेवारी विभागाचा पदभार देण्यात आला आहे. पण त्यानेही गुंठेवारीत फारसा रस दाखविलेला नाही. एकूणच आयुक्त कारचे यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून त्यांनी बदलीच्या जागी न जाता खाबुगिरीच्या विभागात तळ ठोकल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. (प्रतिनिधी)असाही प्रतापमिरजेतील कर्मचाऱ्यांनी बदलीच्या जागी नावापुरतेच काम सुरु केले आहे. त्यांचा जास्तीत जास्त वेळ गुंठेवारीतील फायली हलविण्यातच जातो. या फायलींची छाननी या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. त्यानंतर वरिष्ठांच्या सह्यांसाठी फायली जातात. आता ते वरिष्ठही बदलीच्या जागी येत नसल्याने, सांगलीत येऊन त्यांच्या सह्या घेतल्या जात असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
गुंठेवारी, नगररचनेचा मोह सुटेना
By admin | Published: November 03, 2014 10:41 PM