शीतल पाटील ।सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सांगलीतील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. युती-आघाडीची चर्चा असतानाच तीन ते चार प्रभाग एकत्र आल्याने उमेदवारीचा प्रश्न राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग जोडले गेल्याने दलबदलूंच्या कोलांटउड्यांची चर्चा रंगू लागली आहे, तर काही दिग्गजांनी नव्या प्रभागाचे ‘सर्चिंग’ही सुरू केले आहे.
यंदा महापालिकेची निवडणूक चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. नवीन प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी जुळवाजुळवीला सुरुवात केली आहे. संभाव्य उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांनी प्रभाग रचनेचा अभ्यास करून सोयीचा प्रभाग निवडण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. नव्या रचनेनुसार सांगलीत ११ प्रभाग आहेत. त्यातून ४३ नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रामुख्याने सत्ताधारी काँग्रेस, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, नव्यानेच सत्तेचे स्वप्न पाहणारी भाजप, शिवसेना यांच्यासह जिल्हा सुधार समिती, आम आदमी पार्टी, जनता दल असे पक्षही निवडणूक रिंंगणात असतील. त्यामुळे बहुपद्धतीय प्रभाग रचनेबरोबरच यंदाची निवडणूक बहुरंगी होणार आहे.सांगलीत अकरा प्रभागांत मोठे बदल झाले आहेत.
विद्यमान दोन ते तीन नगरसेवकांचे प्रभाव क्षेत्र एकत्र आल्याने उमेदवारीचा प्रश्न निर्माण होईल. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या खणभाग, नळभाग हा परिसर एकत्र आला आहे. या प्रभागातून महापौर हारुण शिकलगार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक यांचे वर्चस्व आहे. आरक्षणातून दोघेही बचावले असल्याने या प्रभागात काँग्रेसला उमेदवारीचा प्रश्न तितका बिकट नाही; पण राष्ट्रवादीसोबत आघाडी झाल्यास मात्र उमेदवारीची डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादीतून रामभाऊ घोडके इच्छुक आहेत.
शिवसेनेचे दिगंबर जाधव, भाजपचे प्रमोद भोकरे यांच्यासह इतर पक्षातील इच्छुकही मैदानात असतील. त्यामुळे निवडणूक जवळ येईल, तसे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची जोरदार मोर्चेबांधणी विरोधकांकडून होऊ शकते. त्यात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हेही याच प्रभागात येत असल्याने त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागेल. गणेश नगर परिसरातील प्रभाग १५ मध्ये यंदा चुरस असेल. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपमधून माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच माजी नगरसेवक आयुब पठाण, नगरसेवक किशोर लाटणे, बीरेंद्र थोरात हेही मैदानात उतरणार असल्याने जोरदार लढत होणार आहे.
उच्चभ्रूवर्गियांचा समावेश असलेल्या नेमीनाथनगर, चांदणी चौक या प्रभाग १७ मध्येही मोठी चुरशीची स्थिती आहे. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, भाजपचे शेखर इनामदार, संजय कुलकर्णी, काँग्रेसकडून नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेविका मृणाल पाटील इच्छुक आहेत. या प्रभागात संभाव्य उमेदवारांच्या कोलांट उड्या पाहण्यास मिळण्याची शक्यताही आहे. उच्चवर्गीय ते झोपडपट्टी असा संमिश्र परिसर असलेल्या प्रभाग १० मध्येही उमेदवारांची मोठी रेलचेल आहे. खुल्या गटातून माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर व भाजपचे मुन्ना कुरणे यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत. त्यात वडर कॉलनी, गोकुळनगर, टिंबर एरिया, माळी गल्ली या परिसरातील उमेदवारांवर निवडणुकीचे चित्र रंगणार आहे. स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, काँग्रेसच्या शेवंता वाघमारे हेही आमने-सामने येतील.
साखर कारखाना, संजयनगर परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग ११ मध्ये काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. उमेश पाटील, सुनीता पाटील हे दोन विद्यमान नगरसेवक अपक्ष निवडून आले होते, तर संजयनगर परिसरात काँग्रेसच्या कांचन कांबळे विजयी झाल्या होत्या. गेल्या दोन-तीन वर्षात संजयनगर परिसरात भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात राष्ट्रवादीनेही या भागात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सांगलीच्या उत्तरेकडील काकानगर ते पंचशीलनगर, शिवोदयनगरपर्यंतच्या प्रभाग १२ मध्ये माजी नगरसेवक दिलीप सूर्यवंशी यांचा मोठा प्रभाव आहे. या प्रभागातून त्यांचे पुतणे विद्यमान नगरसेवक धीरज सूर्यवंशी हे पुन्हा मैदानात असतील. सूर्यवंशी कोणत्या पक्षातून लढणार, हे अद्याप निश्चित नाही.
गतवेळेप्रमाणे ते अपक्ष म्हणून मैदानात उतरणार, की कोणत्या तरी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार, हे निवडणुकीच्या तोंडावरच स्पष्ट होईल. या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपकडे उमेदवारांची वानवा आहे. कोल्हापूर रोड ते हनुमाननगरपर्यंत पसरलेल्या प्रभाग १८ मध्ये उमेदवारीवरून चुरस असेल. या प्रभागात दोन जागा खुल्या गटासाठी आहेत. राष्ट्रवादीचे राजू गवळी, काँग्रेसचे हणमंत पवार यांच्यासह मनसे, जिल्हा सुधार समिती, शिवसेना, भाजपचे मोठे आव्हान असेल. या प्रभागात ऐनवेळी पक्ष बदलाची शक्यताही वर्तविली जात आहे. महापौर हारूण शिकलगार यांचे नातलगही येथील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यात या प्रभागास इंदिरानगरचा परिसर जोडला गेल्याने स्नेहल सावंत, महेंद्र सावंत हेही या प्रभागातून लढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येथे उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे.सांगलीवाडीत : पारंपरिक लढतीचे संकेतसांगलीवाडीच्या प्रभागात यंदाही पारंपरिक लढतीचे संकेत आहेत. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दिलीप पाटील पुन्हा रिंंगणात उतरणार आहेत. भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांनी हा प्रभाग पुन्हा खेचून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचे चिरंजीव अजिंंक्य पाटील इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून हरिदास पाटील यांनी पाच वर्षात पेरणी केली आहे. याशिवाय ओबीसी व महिला गटातील उमेदवारांवर साऱ्यांच्या नजरा असतील. दिलीप पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकविण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे या प्रभागातील पारंपरिक लढतीकडे महापालिका क्षेत्राचे लक्ष लागले आहे.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गावभाग परिसरातही उमेदवारांवरून संघर्षाची चिन्हे आहेत. या प्रभागातदेखील चुरशीच्या लढती दिसून येणार आहेत. खुल्या गटात एकच जागा असल्याने पंचाईत झाली आहे. भाजपकडून विद्यमान नगरसेवक युवराज बावडेकर इच्छुक आहेत, तर केदार खाडिलकर, शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार, शरद नलावडे यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. या परिसरात माजी आमदार संभाजी पवार यांचेही प्राबल्य आहे. या गटातील शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळी रिंंगणात उतरणार आहेत. त्यात भाजप-सेना युतीची चर्चा आहे. युती झाल्यास उमेदवारीचा घोळ आणखी वाढणार आहे.