सांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी क्षेत्राच्या नियमितीकरणासाठी एकत्रित प्रस्ताव महापालिकेकडे सादर करणार आहोत, त्यासाठी सर्व गुंठेवारी धारकांचा मेळावा पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली. डिसेंबर २०२० पर्यंतची सर्व गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. पाटील म्हणाले की, गुंठेवारीचा विषय सर्वप्रथम सांगलीतून विधानसभेत मांडला गेला. त्यामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागला. संपू्र्ण राज्यातील गुंठेवारीला त्याचा फायदा होणार आहे. सांगलीकरांनीही फायदा घ्यावा. महापालिका क्षेत्रात आमदार निधीतून गुंठेवारीत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली, पण आता शासनानेच सकारात्मक निर्णय घेतल्याने सर्व वसाहती अधिकृत होतील. त्यांना महापालिकेकडून कामे करून घेता येतील. रहिवाशांनी मुदतवाढीचा फायदा घेण्यासाठी नियमितीकरणाचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत.
ते म्हणाले की, प्रस्ताव सादरीकरणाची माहिती देण्यासाठी व एकत्रित प्रस्ताव तयार करण्यासाठी १८ जानेवारीस तीनही शहरांतील गुंठेवारी रहिवाशांचा एकत्रित मेळावा घेतला जाणार आहे. त्यातून सर्वांचे प्रस्ताव एकत्र महापालिकेला सादर केले जातील. रहिवाशांनी मेळाव्याला उपस्थित राहावे.
चौकट
गुंठेवारीच्या जनकांपासून सावध राहा
पाटील म्हणाले की, गुंठेवारी फोफावली तशी गुंठेवारीचे स्वयंघोषित जनकही फोफावले. प्रशासकीय दिरंगाईचा फायदा उठवत पैसे मिळविणे, हा तथाकथित समित्यांचा उद्देश होता. त्यांच्यापासून गुंठेवारीधारकांनी सावध राहावे. कोठेही पैसे न देता कायदेशीर मार्गांनी नियमितीकरण करून घ्यावे.
---------