सांगली , दि. २१ : विश्रामबाग येथे सह्याद्रीनगमध्ये खोजा कॉलनीत राहणाऱ्या सरफराज युसूफ इराणी (वय २६) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी फिरोज इराणी व त्याच्या मुलाचे नाव निष्पन्न झाले आहे.
इराणी समाजातील काही लोक पूर्वी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करायचे. संशयित फिरोज हा समाजातील दागिने चोरणाऱ्या लोकांची नावे पोलिसांना सांगतो, असा समाजाला संशय होता. यावरुन फिरोज आणि समाजात गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे.
या वादातून फिरोजने इराणी वस्तीतून कुटूंबासह स्थलांतर केले होेते. तो खोजा कॉलनीत राहत होता. तरीही त्यांच्यातील वाद मिटला नाही. फिरोज व त्याच्या कुटूंबास कोणत्याही कार्यक्रमास बोलाविले जात नसे.
शुक्रवारी जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील समाजातील एकाचे निधन झाले होते. त्याच्यावर कुपवाड येथील दफन भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी फिरोज मुलासह गेला होता. तिथे समाजातील लोकांनी तू का आला आहेस, असे म्हणून वाद घातला. एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर फिरोज मुलासह घरी आला. त्यावेळी मृत सरफराज इराणी व समाजातील काही लोक जाब विचारण्यासाठी फिरोजच्या घरी गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले.
फिरोजच्या मुलाने गुप्तीने केलेल्या हल्ल्यात सरफराज जागीच मरण पावला. गुप्तीचा वार सरफराजच्या फुफ्फूसात घुसल्याने प्रचड रक्तस्त्राव झाला होता. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होता. खुनामागील निश्चित कारण शोधले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सांगलीत दोन महिन्यात सहा खूनगेल्या दोन महिन्यात शहर व परिसरात सहा खून झाले आहेत. संजयनगर पोलिस ठाण्याच्याहद्दीत तीन, विश्रामबागला एक, सांगली ग्रामीणच्याहद्दीत तीन असे खून झाले आहेत. यातील सर्व खून पूर्ववैमनस्यातूनच झाले आहेत.