जत : जत शहरातील सोलनकर चौकात नाकाबंदीदरम्यान चारचाकी वाहनातून बेकायदेशीर विक्रीस घेऊन निघालेला गुटखा व वाहन जत पोलिसांनी जप्त केला आहे. चार लाख २० हजारांचा गुटखा व चारचाकी वाहन, असा आठ लाख २० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत जत पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी शिवानंद चौगुले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी वाहन चालक सोहेल राजेसाहेब मंगळवेढे (रा. बिळूर, ता. जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील सोनलकर चौकात जत पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून पोती भरून जात असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांना शंका आल्याने गाडी अडवून वाहनाची झाडाझडती केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांची गुटख्याची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी बेकायदेशीर सापडलेला चार लाख २० हजारांचा गुटखा व चारचाकी वाहन, असा आठ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यासह चालक सोहेल मंगळवेढे याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते करीत आहेत.