विटा : विटा येथे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठा केलेला सुमारे ४० हजार ९०० रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला व तंबाखू आणि पवन बाबू गुटखा पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी संशयित विनायक श्रीकांत वरुडे (वय ३२, रा.शितोळे गल्ली, विटा) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सकाळी विटा येथे संशयित वरुडे याच्या राहत्या घरी छापा टाकून विटा पोलिसांनी कारवाई केली.
विनायक वरुडे याने विनापरवाना बेकायदेशीररीत्या केसरयुक्त विमल पान मसाला व पवन गुटखा याचा साठा केल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी वरुडे याच्या घरी छापा टाकला.
त्यावेळी त्याच्या घरात विनापरवाना साठा केलेला केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या सुमारे १८ हजार ७२० रुपये किमतीच्या तीन बॅगा, ४ हजार ६८० रुपये किमतीची व्ही-१ तंबाखू केसरयुक्त विमल पान मसालाच्या पुड्या, मिश्रण करण्यासाठी लागणारी १७ हजार ५०० रुपयांचा पवन बाबू गुटख्याच्या ५ बॅगा असा सुमारे ४० हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी पोलीस नाईक सुरेश भोसले यांनी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विनायक वरुडे यास पोलिसांनी अटक केली आहे.