जत : जत तालुक्यातील बागेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडल्यामुळे नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकली नाही. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश गावकामगार तलाठ्यांना दिले आहेत.
जत शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्यादरम्यान तालुक्याच्या दक्षिण भागात विजांचा कडकडाट सुरू झाला. परंतु पाऊस पडला नाही. त्यादरम्यान बागेवाडी (ता. जत) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान वादळी वाºयामुळे भगवान पडोळकर, सुखदेव आडगळे, शिवाजी वाघमारे यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून नुकसान झाले आहे. या परिसरात काही ठिकाणी वादळी वाºयाने झाडे उन्मळून पडली.
जतपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी व रामपूर गावाच्या उत्तर बाजूला सुमारे तीन चौरस किलोमीटर परिसरात सायंकाळी अचानक गारपीट झाली. यामुळे द्राक्षबागेतील पाने गळून पडली आहेत.गारपिटीमुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे पंचनामे करून शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.पपईचे साडेसात लाखांचे नुकसानशेगाव : जत तालुक्यातील घाटगेवाडी येथे वादळी वारा, गारपिटीच्या पावसाने पपई बागेचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी चार ते पाचच्यासुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. घाटगेवाडी येथे महेश कुलकर्णी यांची तीन एकर पपईची बाग आहे. या बागेच्या लागवडीचा खर्च दीड लाख रुपये आला आहे. वादळी पाऊस व गारा पडल्याने पपई बागेला आलेल्या फुलकळीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या बागेचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर कुलकर्णी यांच्या शेताशेजारील शशिकांत भोसले यांच्या एक एकर पपई बागेचेही अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या नुकसानीचे उद्या तातडीने पंचनामे होणार असल्याचे मंडलाधिकारी संदीप मोरे यांनी सांगितले.