सांगली : हळदीसाठी संपूर्ण भारतात प्रसिध्द असलेल्या सांगली बाजारपेठेतील हळदीच्या उलाढालीत यंदा चांगलीच वाढ झाली आहे. चांगला दर, पारदर्शी व्यवहार व मालासही मागणी मोठी असल्याने यंदा स्थानिकसह परपेठेतील हळदीची आवक वाढली आहे. सोमवारी झालेल्या हळद सौद्यावेळी राजापुरी हळदीची १९ हजार ११४ क्विंटल विक्री झाली, तर निजामाबादच्या ६ हजार ७३८ पोती हळदीची विक्री झाली.
हळदीच्या व्यवहारासाठी देशात सर्वात सुरक्षित बाजारपेठ म्हणून सांगलीचा उल्लेख होतो. यंदाही हळदीची आवक चांगली होत असून, कर्नाटकातील हळदीच्या आवकेत वाढ झाली आहे. कर्नाटकातील हारूगिरी, गोकाक, बागलकोट, घटप्रभा, तेरदाळ परिसरात हळदीचे उत्पादन वाढले आहे. या भागाला सांगली बाजारपेठ सोयीची असल्याने आवक होत आहे. यासह परपेठेतील तेलंगणा, आंध्रप्रदेशातून व नाशिक, नांदेड, जळगावसह स्थानिक भागातून आवक होत आहे.
सध्या प्रत्येक सौद्याला सरासरी २० हजार पोती हळदीची आवक होत आहे. सांगली बाजारपेठेची वार्षिक उलाढाल १२ लाख पोत्यांवर असते. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील हळदीचे उत्पादन चांगलेच घटल्याने उत्तर भारतात सांगलीच्या हळदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे दिल्ली, कानपूर, अहमदाबाद या बाजारपेठेत सांगलीतून हळद जात आहे.
सध्या उच्च प्रतीच्या हळदीला ९ हजार ते १३ हजार रुपये प्रती क्विंटल, चांगल्या प्रतीच्या हळदीला ७ हजार ते ८ हजार, तर पावडर क्लॉलिटी हळदीला साडेसहा हजार ते ७ हजारांपर्यंत दर मिळत आहे. सोमवारी हळद सौद्यांमध्ये राजापुरी हळदीची १९ हजार ११४ क्विंटल विक्री झाली. यास कमित कमी ६ हजार, तर जास्तीत जास्त १३ हजार ३०० रुपये दर मिळाला. प्रती क्विंटल दर सरासरी ९०५० रुपये होता. निजामाबाद परपेठ हळदीची ६ हजार ७३८ पोती विक्री झाली, तर कमाल ४ हजार, तर किमान ८ हजार दर होता. दराची सरासरी ६ हजार रुपयांपर्यंत होती.