Sangli: विश्वजित कदम-सदाशिवराव पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा, खानापूर विधानसभेच्या उमेदवारीवर गुफ्तगू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:24 PM2024-10-18T13:24:45+5:302024-10-18T13:25:19+5:30
विटा : खानापूर विधानसभेसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय ...
विटा : खानापूर विधानसभेसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याशी त्यांनी पारे (ता. खानापूर) येथील कार्यक्रमात सुमारे अर्धा तास चर्चा केली. महाविकास आघाडीतून एकदा उमेदवारी मिळाली की, ती जागा ताकदीने निवडणूक आणण्यासाठी निश्चित पुढाकार घेईन, असा शब्द आ. डॉ. कदम यांनी पाटील यांना दिल्याचे समजते.
काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांचे निकटचे संबंध होते. हेच संबंध काही निवडणुकांमध्ये अनिल बाबर यांना उपयोगी ठरले होते. आजही या दोन कुटुंबीयांचे संबंध तेवढेच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. रामापूर-कमळापूरच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी विश्वजित कदम यांनी अनिल बाबर यांच्या कार्याचा गौरव केला होता.
सध्यस्थितीत सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत सत्तेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीला सत्ता मिळविण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची झाली आहे. कमळापूरच्या कार्यक्रमात विश्वजित कदम व महायुतीचे सुहास बाबर एकाच व्यासपीठावर आल्याने सोशल मीडियावर राजकीय चर्चा रंगली. कदम हे बाबर यांना निश्चित मदत करतील, असे बोलले जाऊ लागले. त्यामुळे आघाडीच्या मित्रपक्षात चलबिचल निर्माण झाली होती.
गुरुवारी दिवंगत ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त विश्वजित कदम व सदाशिवराव पाटील यांच्या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी खानापूरच्या जागेबाबत या दोघांत झालेल्या चर्चेत ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणत्याही मित्र पक्षाला मिळाली तरी काँग्रेस पूर्ण ताकदीने तो उमेदवार निवडून आणण्यासाठी पुढाकार घेईल, असा शब्द कदम यांनी सदाशिवराव पाटील यांना दिल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस पक्ष एकसंघपणे पूर्ण ताकदीने या मतदारसंघात काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.