वारणावती : चांदोली धरणात सध्या केवळ साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १९.९३ अशी आहे. आठ दिवसांत एक टीएमसी पाणी वापर झाला आहे.
शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागातील चांदोली धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले असते. पावसाचे आगार असलेल्या भागात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. दुष्काळी भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. तर कालव्याद्वारे शेतीसाठी व वाकुर्डे योजनेसाठी गेल्या महिन्याभरापासून पाणी सोडले आहे.
धरणात ८ मे रोजी पाणी पातळी ५९९.५० मीटर आहे. पाणीसाठा १५५.३० दशलक्ष घनमीटर म्हणजे ५.४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, तर मृतसंचय (डेडवॉटर) ६.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. कालव्याद्वारे २०० क्युसेक व वारणा नदीपात्रात ११६५ क्युसेक असा एकूण १३६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.ही वस्तुस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसांत धरणाच्या पाण्याने तळ गाठलेला असेल.