इस्लामपूर (जि. सांगली) : तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय, असे म्हणत आज मराठा क्रांती मोर्चाच्या मावळ्यांनी थेट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानावर धडक मारत तब्बल अर्धा तास हलगी आणि घुमक्याचा कडकडाट केला. मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी करणारे पत्र घेण्यासाठी हे आंदोलन झाले. मात्र पत्र मिळविण्यासाठी या मावळ्यांना तासभर उन्हात ताटकळत बसावे लागले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्व प्रमुख कार्यकर्ते जमले होते.छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावरील जयंत पाटील यांच्या बंगल्याकडे आगेकूच केली. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरीही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी तेथे तळ ठोकत घोषणाबाजी केली. हलगी आणि घुमक्याचा ठेका धरला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहर युवकचे कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे पाठिंब्याचे पत्र घेतल्याशिवाय न हलण्याचा निर्णय घेत पुन्हा ठिय्या मारला.त्यानंतर मंत्री पाटील यांच्या जन संपर्क कार्यालयासमोर आंदोलकांनी डेरा टाकला. तेथेही घोषणाबाजी करत हलगी, घुमक्याचा निनाद घुमवत ठेवला. त्यानंतर तब्बल तासाभराने जयंत पाटील यांच्या पाठिंब्याचे पत्र तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले.
करखान्यावरील आंदोलनानंतर या कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांच्याही निवासस्थानी हलगी वाजवत त्यांच्या पाठिंब्याचे पत्र घेत शिराळा तालुक्यात प्रयाण केले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, डॉ.संजय पाटील, दिग्विजय पाटील, धनंजय शिंदे, संतोष माने, उमेश कुरळपकर, डॉ.अमित सूर्यवंशी, माणिक मोरे, विजय महाडिक, अशोक कोकलेकर, विजय धुमाळ, सुहास पाटील, दिग्विजय मोहिते, उमेश शेवाळे, रामभाऊ कचरे, अतुल पाटील, शरद बारवडे यांनी सहभाग घेतला.