अशोक डोंबाळे ।सांगली : ई-नामद्वारे सर्व शेतीमालाचे सौदे काढण्याचे धोरण असून, त्यासाठीच्या मूलभूत सुविधा तयार करण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने सावळी (ता. मिरज) येथे १६ एकर जागा खरेदी केली आहे. या जागेत ६० कोटी रुपये खर्च करून बेदाणा, हळद सौद्यासाठी अद्ययावत हॉल आणि तीन गोदामे बांधली जाणार आहेत. पणन संचालकांकडून मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
सांगली मार्केट यार्डात ई-नामद्वारे बेदाणा, हळदीचे आॅनलाईन सौदे सुरू असून, त्यामुळे जागेची अडचण भासत आहे. आता सावळी ते कानडवाडी रस्त्यावर बाजार समितीने १६ एकर जागा खरेदी केली आहे. या जागेत हळद सौद्यासाठी अद्ययावत ५० हजार चौरस फुटाचा हॉल बांधण्यात येणार आहे. तेथे आॅनलाईन सौदे काढण्यासाठी लागणारी सर्व आधुनिक साधने असतील. हॉलच्या पहिल्या मजल्यावर ११५ गाळे काढण्यात येणार असून, ते अडत्यांना देण्यात येणार आहेत.
हळद ठेवण्यासाठी तीस हजार चौरस फुटाची तीन गोदामे आहेत. त्यांचा शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही वापर करता येणार आहे. बेदाणा सौदे काढण्यासाठी तीस हजार चौरस फुटाचा हॉल आहे. या दुय्यम बाजार आवारात अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था केली जाणार आहे. शेतीमाल घेऊन येणा-या शेतकऱ्यांसाठीही निवास व्यवस्था आहे. यासाठी बाजार समितीचा ६० कोटींचा आराखडा तयार असून, २० कोटींची निविदा काढण्यात येणार आहे.
असे असणार मदनभाऊ पाटील दुय्यम बाजार आवारसावळी-कानडवाडी रस्त्यावर १६ एकर जागेची खरेदीपन्नास हजार चौरस फुटाचा हळद सौद्याचा हॉलपहिल्या मजल्यावरील ११५ गाळे अडत्यांनातीस हजार चौरस फुटाची तीन गोदामेतीस हजार चौरस फुटात बेदाणा सौद्याचा हॉल६० कोटींचा खर्च अपेक्षितपहिल्या टप्प्यात २० कोटींच्या कामाची निविदाअधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी निवास
मंजुरी मिळताच काम सुरू : दिनकर पाटीलसांगली बाजार समितीचा विकास करण्यात माजी मंत्री मदन पाटील यांचे मोठे योगदान असल्याने संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सावळी येथील विस्तारित दुय्यम बाजार आवारास त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठविला आहे. मंजुरी मिळताच निविदा काढून दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सभापती दिनकर पाटील यांनी दिली.
सांगली बाजार समितीतर्फे सावळी (ता. मिरज) येथे दुय्यम बाजार आवार परिसरात हायटेक हॉल उभारण्यात येणार असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.