शिराळा : शहराच्या सुरक्षिततेसाठी हाेम क्वारंटाइन नागरिकांनी काळजी घ्यावी. आरोग्य विभाग आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिराळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी केली आहे.
ते म्हणाले, होम क्वारंटाइन केलेले लोक ५ ते ७ दिवसांत घराबाहेर पडून सुपर स्प्रेडर ठरत आहेत. होम क्वारंटाइन केलेला कोविड रुग्ण १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात आला नाही पाहिजे. कोविड पॉझिटिव्ह असलेला रुग्ण हा १२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवू शकतो. मला काही लक्षणं नाहीत, मी आता बरा आहे, मला काहीच त्रास नाही होत, अशी कारणं सांगत अनेक रुग्ण ५ ते ७ दिवसांत घराच्या बाहेर पडून सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. प्रशासनाला, सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करू शकतो हा विचार करा.
सरकार, प्रशासन त्यांच्या पातळीवर पूर्णपणे काम करत आहे. आपण उत्तम नागरिक म्हणून प्रशासनाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. होम क्वारंटाइन रुग्णाने १५ दिवस घरात आयसोलेशनमध्ये राहून प्रशासनाला मदत केली पाहिजे. आपला १४ ते १७ दिवसांचा होम क्वारंटाइनचा काळ घरात राहून पूर्ण करावा. स्वतः काळजी घ्यावी आणि इतरांना त्रास होईल, असे वर्तन करू नये.