तासगाव : शहरातील कामाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या दालनात चर्चा सुरू असतानाच मतभेद झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक सचिन गुजर आणि बाबासाहेब पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर हमरीतुमरी झाले. तिथे उपस्थित असलेल्या अन्य नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थीने हमरीतुमरी आटोक्यात आणण्यात आली.
नगरसेवक सचिन गुजर हे त्यांच्या मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाका. बागणे चौकातील केळीवाले उठवा, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यासाठी मुख्याधिकारी पाटील यांच्या दालनात गेले होते.
गुजर यांनी बागणे चौकातील केळी व्यापारी हटवा. त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे, अशी मागणी केली. यावेळी त्याठिकाणी बसलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळू सावंत यांनी त्याला विरोध केला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. केळी व्यापाऱ्यांचे हातावर पोट आहे. राज्यभरात केळी आणि फळ विक्रेते चौकातच बसत असतात. त्यामुळे त्यांचे स्टॉल हटवू नयेत, अशी भूमिका सावंत यांनी घेतली. यातून गुजर व सावंत यांच्यातही खडाजंगी झाली.
याचवेळी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील हे मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी वादावर पडदा टाकण्याच्या दृष्टीने सचिन गुजर यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजर काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘तुम्ही मला काही सांगू नका. मुख्याधिकारी माझा फोन उचलत नाहीत. ते तोंडं बघून कामं करतात. तुमचा मला बोलायचा संबंध काय’, असे म्हणून गुजर बाबासाहेब पाटील यांच्यावर भडकले. मात्र यामुळे पाटील यांचा पारा चढला. यातूनच गुजर व पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या दोघा जोरदार शाब्दिक हमरीतुमरी झाली.