लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव नगरपालिकेची सर्वसाधरण सभा झाल्यानंतर पक्षप्रतोदांच्या दालनात काही पदाधिकाऱ्यांत विकासकामांबाबत चर्चा सुरू होती. यावेळी दलित वस्तीच्या निधीवरून चर्चा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी गटातील एक नगरसेवक आणि अन्य एक नगरसेविका आणि त्यांचे पती यांच्यात वादावादी सुरू झाली. हा प्रकार पुढे हमरीतुमरीवर गेला. पक्षप्रतोदांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला. मात्र, याची पालिकेत चांगलीच चर्चा सुरू होती.
तासगाव नगरपालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. ही सभा झाल्यानंतर पक्षप्रतोद जाफर मुजावर यांच्या दालनात काही नगरसेवक, पदाधिकारी बसले होते. या ठिकाणी विकासकामांची चर्चा सुरू होती. यावेळी भाजपच्याच एका नगरसेविकेने प्रभागात दलित वस्तीचा अपेक्षित निधी खर्च होत नसल्याचे सांगितले. दलित वस्तीचा निधी योग्य ठिकाणी खर्च करायला हवा, असे सांगत होत्या. यावेळी अन्य एका सदस्यांनाही याबाबत तुम्हीही बोला असे सुचविले. याच विषयांवरून नगरसेवक आणि नगरसेविकेच्या पतींच्यात जोरदार खडाजंगी झाली. ही खडाजंगी हमरीतुमरीवर आली. त्यानंतर पक्षप्रतोद मुजावर यांनी हस्तक्षेप करून नगरसेविका आणि त्यांच्या पतीची समजूत घालत नगराध्यक्षांच्या दालनात नेऊन वादावर पडदा टाकला. मात्र, या वादावादीची पालिकेत चांगलीच चर्चा सुरू होती.