फोटो : खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील, प्रताप पाटील, खंडू पवार
दत्ता पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, तासगाव तालुक्यातून सोसायटी गटांतून जिल्हा बँकेत जाण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी तयार झाली आहे. सोसायटी गटांतून उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांत आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, दोन्ही पक्षांचे नेते काय भूमिका घेेणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
गतवेळच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्याला भाजप आणि राष्ट्रवादीला झुकते माप मिळाले होते. खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती कमलताई पाटील यांना वेगवेगळ्या गटातून संचालक म्हणून जिल्हा बँकेत जाण्याची संधी मिळाली होती. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रित होते. तासगाव तालुक्यातील सोसायटी गटाची जागा राष्ट्रवादीच्या वाटणीला मिळाली होती. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी त्यावेळी जोरदार रस्सीखेच झाली होती. उमेदवारी मिळविण्यात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार यांनी बाजी मारली होती. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित असल्याने पवार सहजगत्या निवडून येतील, अशी खात्री होती. या निवडणुकीत चमत्कार झाला. सर्वपक्षीय संपर्क असलेले नेते प्रताप पाटील यांनी जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केला होता.
राष्ट्रवादी आणि भाजपमधील कार्यकर्त्यांशी असलेले नेटवर्क भाजपचा अंडरकरंट आणि राष्ट्रवादीतील उमेदवारीवरून असलेली नाराजी याचा नेमका फायदा घेत प्रताप पाटील यांनी सोसायटी गटात बाजी मारली.
जिल्हा बँकेत संचालक म्हणून गेल्यानंतर प्रताप पाटील यांनी तालुकाभर जनसंपर्क वाढवत, कोणताही गट-तट न पाहता सर्वपक्षीय संबंध प्रस्थापित करून सोसायटीतील पदाधिकारी, सभासदांची अनेक कामे मार्गी लावली आहेत.
पाच वर्षे केलेल्या कामाच्या जोरावर आणि सर्वपक्षीय संबंधामुळे प्रताप पाटील पुन्हा जिल्हा बँकेत जाण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रताप पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे सदस्य अर्जुन पाटील, सतीश पवार, माजी तालुकाध्यक्ष डी. के. पाटील यांच्यासह पहिल्या फळीतील अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. भाजपकडून तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक लागण्यापूर्वी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, मोठी मांदियाळी तयार झाली आहे. जिल्हा बँकेत निवडणुकीत कोणते समीकरण तयार होणार अखेरपर्यंत मैदानात कोण राहणार यासह नेत्यांच्या निर्णयावर सोसायटी गटातील समीकरण अवलंबून आहे.
चौकट :
प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर
जिल्हा बँकेसाठी सोसायटी गटातून विद्यमान संचालक प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वपक्षीय संंबंध, राजकीय कुरघोड्यांपासून अंतर ठेवून शेतकरी, सोसायट्या सक्षम करण्यासाठी केलेल्या कामांमुळे मतदारांशी असलेला थेट संबंध यामुळे प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
चौकट :
खंडू पवार यांच्या नावाची चर्चा :
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी थेट कनेक्ट झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रवादी सत्तेत येण्यापूर्वीपासून मणेराजुरी येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी बंडू पवार हे जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी असलेल्या थेट संबंधांमुळे खंडू पवार यांनाही प्रक्रिया, संस्था गटातून संधी मिळेल, अशी चर्चा आहे.