कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सात खासगी डॉक्टर संस्थात्मक विलगीकरण केंद्रात मोफत सेवा देत आहेत. या डॉक्टरांनी स्वतःच्या रुग्णालयातील २५ खाटांही विलगीकरण केंद्रासाठी दिल्या आहेत.
कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांनी येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत चिंचणी येथील डॉ. सुधीर डुबल, डॉ. सुनीता डुबल, डॉ. महेश चव्हाण, डॉ. अशपाक मुल्ला, डॉ. आरिफा मुल्ला, डॉ. अरुण दाईंगडे, डॉ. संचित कोळी या सात डॉक्टरांनी पुढे येत कोरोना योद्धा म्हणून कोविड युद्धात उडी घेतली आहे. डॉक्टरांची फौज पाठीशी असल्याने ग्रामस्थांनीही लोकसहभागातून कोरोना रुग्णांसाठी चहा, नाष्टा, फळे, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, उकडलेली अंडी, पौष्टिक पदार्थ आदी सोयीसुविधा दिल्या आहेत. याशिवाय आजवर दोन लाख ३० हजारांची देणगी या केंद्रास मिळाली आहे. २५ बेडचे हे विलगीकरण केंद्र आदर्शवत ठरत आहे.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी येथील डॉक्टर व आशा स्वयंसेविका रुग्णांची ऑक्सिजन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तत्काळ चाचणी घेत आहेत. रुग्णांना तत्काळ विलगीकरण केंद्रात दाखल केले जात आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्याने बहुतांशी सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५च्या पुढे राहत आहे. यामुळे येथील रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासलेली नाही.
चौकट
फॅमिली डॉक्टरांमुळे भीती गायब
विलगीकरण केंद्रात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना सेवा देण्यासाठी त्यांचेच फॅमिली डॉक्टर येत आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या मनातील भीती नाहीशी होत आहेत. गावातील अनेक रुग्ण ठणठणीत बरे झाल्यामुळे घरी परतले आहेत.
फोटो ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथील शिवाजी हायस्कूलमध्ये सुरू केलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात डॉ. सुधीर डुबल व डॉ. सुनीता डुबल, माजी सरपंच संजय पाटील व स्वयंसेवक विक्रम महाडिक.