सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील उद्योजक भास्कर होसमणी यांच्या खूनप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या खुनामागे आर्थिक वादासह अनेक कारणे असल्याचे पुढे येत आहे. शनिवारी एका रिक्षाचालकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. चार ते पाच हल्लेखोरांनी खून केल्याचा संशय आहे. त्यापैकी एका हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले आहे. पण खुनानंतर तो रातोरात गायब झाला आहे. त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. इनाम धामणी ते सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील म्हसोबा मंदिरासमोर भास्कर होसमणी यांचा शुक्रवारी रात्री साडेनऊ खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात लाकडी बॅट घालण्यात आली होती. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर डोके दगडाने ठेचले होते. घटनास्थळी तीन वेगवेगळे दगड सापडले आहेत. या तीनही दगडांना रक्त लागलेले आहे. त्यांच्या बुलेट मोटारसायकलवरही रक्त पडले होते. घटनास्थळी अंधार असल्याने पोलिसांनी रात्री पंचनामा करण्यास अडचण येत होती. यासाठी त्यांनी लोखंडी बॅरिकेटस् लावून एक पथक तैनात केले होते. शनिवारी दुपारी पंचनामा केला. होसमणी यांचे पाकीट, रिव्हॉल्व्हर, तीन जिवंत काडतुसे, पेन, मोबाईल हॅण्डसेट रस्त्यावर पडला होता, तर हल्ला केलेल्या बॅटचे दोन तुकडे झाले होते. ही बॅट हल्लेखोरांनी रस्त्याकडेच्या शेतात फेकून दिली होती. डोक्यात घातलेले तीन दगडही शेतात पडले होते. या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. होसमणींना हल्लेखोरांनी इनाम धामणी रस्त्यावर बोलावून घेतल्याची शक्यता आहे. खून झाला, त्यावेळी त्यांच्या हाताच्या बोटातील एक अंगठी गायब झाल्याची माहिती आहे. अन्य दागिने त्यांनी घातले होते का नाही, याची पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही. (प्रतिनिधी) आर्थिक वाद : दुचाकी उचलून आणली होसमणी यांनी साखर कारखाना परिसरातील एका कॅन्टीन चालकास तसेच त्याच्या बहिणीस प्रत्येकी पन्नास हजार हातऊसने दिले आहेत. हे पैसे त्यांना परत मिळाले नाहीत. यावरुन कॅन्टीन चालकाशी त्यांचा वाद सुरु होता. यातून होसमणी यांनी कॅन्टीन चालकाची दुचाकी उचलून आणली होती, अशी माहिती पोलिसांना तपासातून मिळाली आहे. शिरढोणजवळ बालक ठार कवठेमहांकाळ/शिरढोण : रस्ता ओलांडून घरी जात असताना शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन बालकांना मालवाहतूक करणाऱ्या (पीकअप) वाहनाने धडक दिली. त्यात नऊ वर्षाचे बालक जागीच ठार झाले, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. तिला कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी दुपारी मिरज-पंढरपूर मार्गावरील शिरढोणजवळ घडली. शिरढोणजवळ प्रज्ज्वल अनिल सूर्यवंशी (वय ९) व त्याची बहीण संजीवनी (वय ६) हे दोघेजण रस्ता ओलांडून घरी जात होते. यावेळी पंढरपूरहून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने (क्र. एमएच 0६ एजी ७४0९) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये प्रज्ज्वलचा जागीचा मृत्यू झाला, तर संजीवनी गंभीर जखमी झाली. अपघातस्थळी ग्र्रामस्थांनी गर्दी केली होती. वाहनचालक पसार झाला आहे. (वार्ताहर)
उद्योजकाच्या खुनाचे धागेदोरे हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 12:39 AM