शिरटे : कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळत आमदार आशिष शेलार यांनी लगावला.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहुल महाडिक, संग्राम महाडिक, सागर खोत, सभापती जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शेलार म्हणाले, या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही मूठभर लोकांची भावना अडते आणि दलालांचे समर्थन करणारी आहे. केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून, देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल, त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा.
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, प्रश्न निर्माण करायचे, ते तेवत ठेवायचे, हे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने की अडते-दलालांच्या बाजूने आहोत, हे राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट करावे.
संयोजक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सचिन पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी आ. भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, विक्रम पाटील, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, अमोल पाटील, गोरख पाटील उपस्थित होते.
दरम्यान, येडेमच्छिंद्र येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निशिकांत भोसले-पाटील यांना मानणारे आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाकडे न जाता ग्रामपंचायत कार्यालयातच आमदार शेलार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी सरपंच गणेश हराळे, शरद पाटील, सुभाष चव्हाण, राहुल खराडे उपस्थित होते.
चौकट
पवारसाहेब, तुम्ही विश्वासघातकी होता, असा इतिहास लिहिला जाईल!
यात्रेचे प्रमुख, आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याचे म्हटले आहे. मात्र आता ते दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देत आहेत. पवारसाहेब, तुम्ही असे दुटप्पी वागला, तर भविष्यात तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता, तर विश्वासघातकी होता, असा इतिहास लिहिला जाईल. काँग्रेसने शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवले होते. या कायद्याने त्यांची पारतंत्र्यातून मुक्तता होणार असून, शेतकरी हा राजा होणार आहे.