मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे गर्भपात व भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यासह संबंधितांविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचा ठराव शुक्रवारी मिरज पंचायत समितीच्या सभेत केला. डॉ. खिद्रापुरे याच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या म्हैसाळ उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पोलिस यंत्रणेने चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली. मिरज पंचायत समितीच्या मावळत्या सभागृहाची सभा सभापती प्रवीण एडके यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत विजयी झालेले जि. प.चे नूतन सदस्य अरूण राजमाने, जयश्री पाटील व पंचायत समितीचे नूतन सदस्य अशोक मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणाचे पडसाद सभेत उमटले. सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत, म्हैसाळ येथे झालेल्या भ्रूणहत्येचा निषेध केला. निनावी पत्राद्वारे यापूर्वी क्रूरक्रर्मा डॉ. खिद्रापुरेच्या गैरकृत्याविरोधात प्रशासनाकडे झालेल्या तक्रारींची दखल घेतली असती, तर अनेक उमलत्या कळ्यांचे जीव वाचले असते. विवाहितेचा बळी गेल्यानंतर प्रशासनास जाग आल्याबाबत सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. डॉ. खिद्रापुरे याच्याविरोधात खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा देण्याच्या सतीश निळकंठ यांच्या मागणीचा ठराव संमत करण्यात आला. डॉ. खिद्रापुरे याच्याकडून झालेल्या भ्रूणहत्येची बाब तत्कालीन जि. प. सदस्य केदारराव शिंदे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असताना, त्याकडे दुर्लक्ष केले. रूग्णालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव नाकारला असताना तो बेकायदेशीरपणे सुरू होता. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन बेकायदेशीर सुरू असलेल्या रूग्णालयावर कारवाई करणे आवश्यक होते. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने गर्भपात व कोवळ्या मुलींच्या हत्या झाल्या. मुलींअभावी २५ टक्के मुले अविवाहित आहेत. भ्रूणहत्येच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून प्रशासन समाजास अंधारात लोटत असल्याचा आरोप सुभाष पाटील यांनी केला. तेजश्री चिंचकर, जयश्री कबुरे, सारिका खताळ, शुभांगी पाटील, शंकर पाटील, आबासाहेब चव्हाण, बाबासाहेब कांबळे यांनी या घटनेचा निषेध करीत संबंधितांना फाशी देण्याची मागणी केली. (वार्ताहर)प्रशासन म्हणते : पाठपुरावा सुरू डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या भ्रूणहत्येमुळे म्हैसाळसह मिरज तालुका बदनाम होत आहे. या निषेधार्ह घटनेशी संबंधितांची चौकशी करून पोलिस कारवाई करीत आहेत. दोषींवर कारवाईसाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी सांगितले.
म्हैसाळमधील खिद्रापुरेला फाशी द्या
By admin | Published: March 10, 2017 10:57 PM