तानाजी घोरपडे -- हुपरी -रौप्यनगरी अशी ख्याती निर्माण केलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) सह परिसरातील रेंदाळ, यळगूड, रांगोळी व जंगमवाडी या पाच गावांतील सर्वसामान्य, गोरगरीब, दीनदलित, श्रमिक, कष्टकरी जनतेच्या आरोग्यसेवेसाठी उभारलेले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांचा आधारवड बनले आहे. रौप्यनगरीच्या अगदी मध्यभागी प्रशस्त जागेमध्ये १८ एप्रिल १९८७ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली. हुुपरी, रेंदाळ, यळगूड, रांगोळी, जंगमवाडी या केवळ पाच गावांचा या केंद्रामध्ये समावेश असला तरीही सुमारे ८५ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. गेल्या १२५ वर्षांपासून कार्यरत असणारा चांदी व्यवसाय रेंदाळ-यळगूडमधील यंत्रमाग व्यवसाय तसेच नजीकच असणाऱ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमुळे परिसरात सर्वसामान्य गोरगरीब, दीनदलित, श्रमिक, कष्टकरी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. आरोग्य केंद्राची सुसज्ज सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी इमारत आहे. या इमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी कक्ष, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण असे स्वतंत्र विभाग, आरोग्य सहायक, सहायक कक्ष, औषध भांडार, इंजेक्शन रुम, विविध प्रकारच्या लस साठवणीचे कक्ष, ड्रेसिंग रुम, डिलिव्हरी रुम, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोग शाळा, धर्मशाळा, मिटींग हॉल, आस्थापना विभाग, हिरकणी कक्ष, शवविच्छेदन विभाग, नेत्रतपासणी विभाग अशा अद्ययावत सुविधा येथे उपलब्ध आहेत. संपूर्ण आरोग्य केंद्रात २४ तास पाणी, वीज उपलब्ध आहे. शौचालये, बाथरुमची सुविधा उपलब्ध असून, गरम पाण्यासाठी सोलर प्लान्टची उभारणी केली आहे. महिलांना प्रसूतीनंतर मोफत आहार वाटप योजना, मोफत वाहतुकीची सुविधा, ३0 दिवसांच्या आतील बालकांना संपूर्ण आरोग्य सेवा, सुसज्य प्रयोगशाळेमध्ये मोफत चाचणी, तपासणी करण्यात येते. रक्त तपासणी व नेत्र तपासणी उत्तम प्रकारची केली जाते. तसेच एच. बी., शुगर, एच.आय.व्ही, रक्तगट तपासणी, कावीळ, टी. बी., रक्त, लघवी तपासणीही मोफत केली जाते. याठिकाणी चांगल्या सोयी-सुविधा मिळत असल्याने प्रतिवर्षी सुमारे २५ ते ३0 हजार रुग्णांची तपासणी होते. तसेच सुमारे ५00 हून अधिक प्रसूती करण्यात येतात. तितक्याच संख्येने कुटुंब नियोजनच्या शस्त्रक्रियाही येथे करण्यात येतात. श्वानदंश आणि सर्पदंश उपचार, माता तपासणी, उपचार आणि लसीकरण मोफत केले जाते. हिवताप, क्षयरोग, कुष्ठरोग, अंधत्व निवारण, माता बाल संगोपन, एडस् नियंत्रण व क्षार संजीवनी अशा राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली जाते.शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या व रुग्णांना गरज असणाऱ्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येतात. रुग्णांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा आणि रुग्ण व संस्था यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. - डॉ. ए. एन. कामते, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीची पाऊले, सावित्रीबाई फुले, कन्या कल्याण योजना, विमा योजना, प्रसूती मातेस मोफत आहार व सेवा पुरविल्या जातात. प्राथमिक, माध्यमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, जंतुनाशक गोळ््यांचे वाटप, स्वच्छतेबाबत प्रबोधन उपक्रमही राबविले जातात.
रुग्णांचा आधारवड ठरलेले हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र
By admin | Published: February 29, 2016 11:34 PM