लक्ष्मण सरगरआटपाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामध्ये 'हर घर तिरंगा' मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडीमध्ये मात्र कोठेच हर घर तिरंगा फडकलाच नाही. यामुळे या ठिकाणी राहिलेले ग्रामस्थांनी आम्ही भारत देशाच्या नकाशात तरी आहे का ? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे आटपाडी तालुका अध्यक्ष जालिंदर कटरे यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपनाची वस्तुस्थिती उजेडात आणली आहे. कटरे यांनी शेंडगेवाडी मध्ये प्रत्यक्ष जात अनेक घरांना भेटी दिल्या आहेत. यावेळी शेंडगेवाडीमध्ये प्रशासनाच्या वतीने कोणीही झेंडे दिले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचशिवाय प्रशासनाचा कोणताही कर्मचारी फिरकलाच नसल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक शाळा व काही लोकांनी विकत आणलेले झेंडे सोडले तर कोठेच हर घर तिरंगा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.शेंडगेवाडी हे गाव आटपाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत. आज अखेर शेंडगेवाडीमध्ये मूलभूत सुविधा मिळाल्याचा नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकला होता. तरीही याठिकाणी अद्याप सुविधांची वानवा आहे.संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम मोठ्या गाजावाजात साजरी केली गेली. मात्र कायमच दुर्लक्षित राहिलेल्या शेंडगेवाडीत ही प्रशासनाच्या नाकर्तेपणा मुले हर घर तिरंगा पोहचलाच नाही. या बाबत दोषी असणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जालिंदर कटरे यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील 'या' गावात 'हर घर तिरंगा' फडकलाच नाही, ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:55 PM