सांगली : परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी सोडून हरिपूर (ता. मिरज) येथील एका संशोधकाने आपल्या गावातच संशोधनाचा कारखाना उभारून नवनव्या प्रयोगांना जन्म दिला. इलेक्ट्रिकल सायकल, इलेक्ट्रिकल व्हिलचेअर, मोल्डलेस कंपोझिट फायबर, सोलर पॉवरबेस इलेक्ट्रिक रिक्षा असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत.
हरिपूर येथील प्रा. शाम गुरव यांनी अवकाश विषयावर नेदरलँड येथे डॉक्टरेट मिळवली आहे. मद्रास येथे त्यांनी एम.टेक्.चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एअरक्राफ्ट डिझायनिंग क्षेत्रात काम केले. नासाच्या एका प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. सध्या ते अहमदाबाद विद्यापीठात सल्लागार म्हणून काम करीत आहेत. परदेशात नोकरी व उद्योगाच्या अनेक संधी सोडून त्यांनी आपल्या गावातच काही तरी करण्याचा विचार त्यांनी केला. त्यातून त्यांनी ही फॅक्टरी हरिपूर येथे उभी केली. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अभियंत्यांना त्यांनी यात समावून घेतले. जिल्ह्यात शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा शोधत राज्यभर फिरणाऱ्या मुलांना रोजगार आणि संशोधनाची संधी देण्याचा विचार त्यामागे असल्याने गुरव यांनी ही फॅक्टरी सुरू केली.
सुरुवातीला त्यांनी अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हिलचेअरचा प्रयोग हाती घेतला. त्यात त्यांना यश मिळाले. ज्या व्हिलचेअरची बाजारात १ ते सव्वा लाख किंमत आहे, तितक्याच सुविधांची व्हिलचेअर ७५ टक्के कमी किमतीत त्यांनी तयार केली. लॉकडाऊन काळात त्यांनी इलेक्ट्रिकल सायकल तयार केली. छोट्या मोपेडचा फिल येणाऱ्या, पण सायकलचा लूक असणाऱ्या वजनाने अत्यंत हलक्या अशा इलेक्ट्रिकल सायकलचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही फॅक्टरी आनंद व त्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देणारी ठरत आहे.
कोट
प्रचंड आर्थिक कसरत करीत ही फॅक्टरी आम्ही सुरू केली. अभियंत्यांना या प्रकल्पात समावून घेताना परिसरातील गोरगरीब मजुरांनाही काम दिले आहे. फॅक्टरीची व्याप्ती वाढविताना व्यावसायिकतेपेक्षा समाजासाठी आवश्यक उपकरणांची परवडणाऱ्या दरात निर्मिती करण्याचा उद्देश आहे.
-प्रा. शाम गुरव, संशोधक हरिपूर