पोलीस निरीक्षक हसबनीस याच्याविरोधात कडेगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याबाबत बतावणी करून पीडित तरुणीला कडेगाव येथील बंगल्यावर आणून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार होती.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस याच्याविरुद्ध २८ ऑगस्ट २०२० रोजी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी हसबनीस याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला होता. जिल्हा न्यायालयात पीडितेच्यावतीने ॲड्. अमित शिंदे यांनी बाजू मांडली होती. या प्रकरणात तपास अधिकारी संशयिताला मदत करीत आहे, पोलिसांकडे हजर केलेले कपडे व पुराव्यामध्ये छेडछाड केली असून संशयिताने गुन्हा दाखल झाल्यानंतर घरी येऊन धमकावल्याचे व फिर्याद मागे घेण्यासाठी पैशाची ऑफर दिली असल्याचे शपथपत्र पीडितीने ॲड्. शिंदे यांना सादर केले होते. पोलीस व्यवस्थित तपास करीत नसल्याने गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. आरोपीस जामीन दिल्यास माझ्या जीवितास धोका आहे, संशयिताकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हसबनीस याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयानेही हसबनीस याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. हसबनीसला कधी अटक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.