सांगली : शहरातील बिल्डरांनी पार्किंगच्या जागा हडप करून व्यवसायिक वापर केला आहे. अशा बड्यांच्या अतिक्रमणावर सोमवारपासून हातोडा पडणार आहे. महापालिकेने कारवाईसाठी जय्यत तयारी केली असून, प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात होणार आहे. तोपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार आल्यापासून शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम जोमाने सुरू आहे. रस्ते, फूटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला असताना आता बड्यांच्या अतिक्रमणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात पार्किंग व सामासिक अंतराच्या जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. सुमारे ४६० जणांना बेकायदा बांधकामासंदर्भात महापालिकेने नोटीस बजाविली आहे. अशा बड्या लोकांच्या बेकायदा बांधकामांवर सोमवारपासून हातोडा टाकला जाणार आहे. एका मोठ्या बिल्डरावर कारवाईची महापालिकेच्या पथकाने तयारी केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात डिजिटल फलक लावले आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. विनापरवाना फलक लावण्याऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सध्या रस्ते मोकळे करण्याची मोहीम काही काळासाठी लांबणीवर टाकून बड्यांच्या अतिक्रमणावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. (प्रतिनिधी)शनिवार बाजार : पर्यायी व्यवस्थाशहरातील मुख्य बाजारपेठेत दर शनिवारी भरणारा आठवडा बाजार हटविण्यात येणार आहे. महापालिकेकडून विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. येत्या दोन दिवसांत पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर शनिवारच्या बाजारातील विक्रेत्यांना सुरुवातीला आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या शनिवारी विक्रेत्यांनी पर्यायी जागेत स्थलांतर केले नाही तर, थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. शंभर फुटी, ईदगाहची पाहणीसांगलीतील शंभर फुटी रस्ता व मिरजेतील ईदगाह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. या दोन्ही रस्त्यांची जिल्हाधिकारी गायकवाड सोमवारी पाहणी करणार आहेत.
बड्या अतिक्रमणांवर आज हातोडा पडणार
By admin | Published: January 03, 2016 11:30 PM