अर्जुन कर्पे ।लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : तालुक्यात भुरट्या चोºया, वाटमारी अशा घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, कवठेमहांकाळ शहरातील मंगळवारच्या बाजारात मोबाईलचोरांनी थैमान घातले आहे. तर हिसडा टोळीनेही कवठेमहांकाळ पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. ‘शिरजोर चोर आणि हतबल पोलिस’ अशी कवठेमहांकाळ तालुक्याची अवस्था झाली आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या सहा महिन्यात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. वाटमारी, मंगळवारच्या बाजारात मोबाईल चोरी, महिलांच्या गळ्यातील दागिने पळवणारी हिसडा टोळी, घरफोड्या करणारी टोळी यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना सळो की पळो करून सोडले आहे.कवठेमहांकाळ शहरातील मंगळवार बाजारात तालुक्यातील तसेच जत, कर्नाटक, सांगोला, आटपाडी या तालुक्यांतून व्यापारी, ग्राहक येतात. परंतु गेल्या महिन्याभरात या बाजारात मोबाईल चोरणाºया टोळीने धुमाकूळ घातला आहे. दोन आठवड्यात तब्बल पन्नासहून अधिक नागरिकांचे मोबाईल चोरण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या मोबाईलचोरांचा मोठा धसका घेतला आहे. या मोबाईलचोर टोळीला पकडण्यात किंवा त्यांचा शोध घेण्यात कवठेमहांकाळ पोलिस अपयशी ठरले आहेत. या मोबाईलचोरट्यांचा कवठेमहांकाळ पोलिस शोध घेऊन बंदोबस्त करणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.तसेच कवठेमहांकाळ तालुक्यात महिलांचे दागिने चालत्या गाडीवरून लंपास करणाºया हिसडा टोळीनेही दहशत निर्माण केली आहे. सहा महिन्यांपूर्वी कुची कॉर्नर येथून एका महिलेचे दागिने दुकानातून हिसडा मारून लंपास करण्यात आले, तर दोन दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ-हिंगणगाव रस्त्यावर या हिसडा टोळीने एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रत्येकवेळी ही हिसडा टोळी कवठेमहांकाळ पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे, तर आता महिला संघटना, सर्वसामान्य नागरिक या चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यात यावा, अशी आक्रमक मागणी करू लागले आहेत.गेल्या महिन्यात कुची येथे पाच-सहा दुकाने या चोरट्यांनी फोडली व एक दुचाकी लंपास केली, तर करोली-टी येथेही घरफोडी करून लाखाचा ऐवज लंपास करण्यात चोरटे यशस्वी ठरले.तालुक्यात वाटमारी, घरफोडी, महिलांचे दागिने लंपास करणे, मोबाईल चोरी या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून, यामुळे तालुक्यात सर्वसामान्य नागरिक, महिला त्रस्त झाल्या आहेत. या भुरट्या चोरट्यांना कवठेमहांकाळ पोलिस आळा घालणार की नाही, त्यांचा शोध घेणार की नाही,असा संतप्त सवाल करू लागले आहेत.एकूणच कवठेमहांकाळ तालुक्यात चोरट्यांनी दहशत माजवली असून, कवठेमहांकाळ पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. खाकी वर्दीसमोर हिसडा टोळी, वाटमारी टोळी, मोबाईलचोर टोळी, घरफोडी टोळी शिरजोर झाल्याचे तालुक्यात स्पष्ट चित्र आहे. याचा शोध घेणे कवठेमहांकाळ पोलिसांना एक आव्हान बनले आहे. दरम्यान या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मगाणी होत आहे.केवळ हरवल्याची तक्रार घेतात...कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात मोबाईल, दुचाकी, चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता, संबंधित दाखल करून घेणारा पोलिस चोरीचा गुन्हा दाखल करून घेत नाही. हरवल्याची तक्रार देण्यास भाग पाडतात. त्यामुळे पीडित नागरिक एक तर चोरी झाल्यामुळे त्रस्त असतो. तो पोलिसांच्या अशा वागण्यानेही हतबल होतो. यावर वरिष्ठ अधिकारी सामान्य जनतेची गाºहाणी ऐकणार का? असा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे.
हतबल पोलिस, चोर शिरजोर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:21 PM