अविनाश कोळी, सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब होणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. या चर्चेला पूर्णविराम देत संजय पाटील यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
सलग दोनदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या संजय पाटील यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्वास टाकला. दुसऱ्या यादीत सांगलीच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यातून संजय पाटील यांनी उमेदवारीची हॅटट्रिक केली. महिन्याभरापासून सांगली मतदारसंघात भाजपकडून कोण उमेदवार असणार, याची चर्चा रंगली होती. पक्षांतर्गत इच्छूक वाढत असतानाच यंदा धक्कातंत्राचा अवलंब वरिष्ठ नेत्यांकडून होणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. या सर्व तर्कवितर्कांना खोटे ठरवित संजय पाटील यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली.
महिन्यापूर्वी भाजपचे सांगलीतील प्रचार कार्यालय संजय पाटील यांच्या संस्थेत उभारले गेल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी याच प्रचार कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील समर्थकांनीही फटाक्यांची आतषबाजी करीत, पेढेवाटप करीत आनंद साजरा केला. प्रचार कार्यालयात समर्थकांची गर्दीसांगलीच्या मार्केट यार्डातील भाजपच्या प्रचार कार्यालयात बुधवारी दिवसभर संजय पाटील थांबून होते. यादीत नाव येताच त्यांच्या समर्थकांनी कार्यालयात गर्दी केली. पाटील यांना पेढा भरवून आनंदा साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ‘ठरलंय नक्की, हॅटट्रिक पक्की’, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.