हौसाताईंच्या निधनाने मोठा आधार हरवला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची आयुष्याची वाटचाल केली. क्रांतिसिंहांच्या लढ्यात हिरिरीने सहभागी झाल्या. त्यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहे. क्रांतिविरांगना या उपाधीला शोभेसे त्यांचे आयुष्य होते.
- माधवराव माने, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
वयाच्या नव्वदीतही हौसाताईंचे विचार क्रांतिकारी राहिले. वृद्धापकाळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या उपोषणात सहभागी झाल्या होत्या. तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गोव्यातून शस्त्रे आणण्यासाठी त्यांनी खाडीतून तराफ्यावरून धाडसाने प्रवास केला होता. तीच धडाडी व धाडस अखेरपर्यंत कायम राहिले. बेळगावात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सक्रिय सहभागी राहिल्या. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधार हरवला आहे.
- प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ज्येष्ठ विचारवंत
हौसाताई म्हणजे चळवळींचे प्रेरणास्थान होत्या. त्यांची इच्छाशक्ती अखेरपर्यंत कायम होती. त्यांच्या छायेखालीच आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते वाढले. कितीही निराशेची स्थिती आली तरी त्याला दोन हात करण्याची ताकद हौसाताईंनी वेळोवेळी दिली. त्यांच्या प्रेरणेने अनेक चळवळी उभ्या राहिल्या. सध्याच्या निराशेच्या काळात त्यांच्या जाण्याने चळवळींचा महत्त्वाचा धागा खंडित झाला आहे.
- संपतराव पवार, पाणी चळवळीतील अग्रणी
क्रांतिसिंहांच्या विचारांना साजेसे जीवन हौसाताई शेवटपर्यंत जगल्या. क्रांतिकारकाची मुलगी कशी असावी याचे त्या नेमके उदाहरण होत्या. दुष्काळी भागात असूनही चळवळीचा गाडा त्यांनी सांभाळला. समन्यायी पाणी वाटपासाठी सतत रस्त्यावर राहिल्या. बळीराजा धरणाप्रमाणेच क्रांतिसिंहांच्या नावानेही हणमंतवडिये येथे धरण बांधण्याचे नियोजन त्यांच्या जाण्याने अधुरे राहिले. स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा धागा निखळला आहे.
- धनाजी गुरव, विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते
स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित शेवटचा दुवा हौसाताईंच्या निधनाने निखळला आहे. देशासाठी आणि समाजासाठी त्यांचे काम अमूल्य असेच आहे. त्यांच्या विचारांनुसार वाटचाल करणे हीच श्रद्धांजली ठरेल.
- वैधव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा संकुल
आई विजयाताई लाड आणि हौसाताई या दोघीही आमचे प्रेरणास्थान होत्या. हौसाताईंना भेटने त्यावेळी त्यांच्याकडून आईचे प्रेम मिळायचे. जीडी बापूंचा पराक्रम नेहमी सांगायच्या. शेतकऱ्यांसाठी लढण्याची त्यांची ऊर्जा अखेरपर्यंत कायम होती. शिक्षण कमी असले तरी व्यवहारज्ञान अफाट होते. त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असेल.
- अरुण लाड, आमदार
हौसाताई लढाऊ महिला होत्या. अखेरच्या क्षणापर्यंत चळवळीशी नाते कायम राखले. त्यांच्या निधनाने प्रेरणास्थान हरवले आहे.
- प्रा. शरद पाटील, माजी आमदार