सांगली : समाजवादी चळवळीच्या संयुक्त धाग्याने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव व वाळव्यातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे कुटुंबीय एकमेकांशी बांधले गेले होते. नागनाथअण्णांच्या निवडणूक प्रचारासाठी ते दोन वेळा सांगली व कराडला आले होते. नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनीही त्यांनी वाळव्यात हजेरी लावली होती. त्यांच्या कुटुंबीयांशी ते शेवटपर्यंत संपर्कात होते.नागनाथअण्णांनी १९९६ मध्ये कराड लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी कराडमध्ये मुलायमसिंह यादव यांची सभा झाली होती. त्यानंतर पुन्हा सांगली लोकसभा मतदारसंघातील २००४ च्या निवडणुकीसाठी ते प्रचाराला आले होते. सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर त्यांची सभा झाली होती. दोन तास त्यांनी सांगलीत हजेरी लावून समाजवादी विचारसरणीच्या लोकांशी संवाद साधला होता.
नागनागअण्णांशी सातत्याने ते संपर्कात होते. अण्णांच्या निधनाने त्यांना धक्का बसला होता. त्यानंतर नागनाथअण्णांच्या प्रथम स्मृतिदिनी म्हणजेच २२ मार्च २०१३ रोजी ते वाळव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सभेत अण्णांच्या स्मृतीला उजाळा दिला होता. देशातील राजकीय स्थितीवर भाष्यही केले होते. हुतात्मा संकुलातील इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले होते.
मुलायमसिंहांनी मागविला अण्णांचा फोटोमुलायमसिंहांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात नागनाथअण्णांचा फोटो लावला होता. त्यावेळी सांगलीतून त्यांनी हा फोटो मागविला होता.
एकत्रीकरणाचा अजेंडा कायमनागनाथअण्णांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मुलायमसिंह यांनी देशभरातील समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत या गोष्टीसाठी धडपड केली.
मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नायकवडी कुटुंबीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गोरगरिबांसाठी झटणारा चांगल्या विचाराचा नेता निघून गेल्याने देशाचीही मोठी हानी झाली आहे. - वैभव नायकवडी, प्रमुख, हुतात्मा संकुल, वाळवा.