आटपाडी (जि. सांगली) : आटपाडीत कार्तिक पौर्णिमेला प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारात १६ लाखांचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. आटपाडीतील साेमनाथ जाधव यांनी हा बकरा विकत घेतला हाेता. या किमती बकऱ्याची शनिवारी पहाटे जाधव यांच्या शेगदार मळा परिसरातील शेडमधून चोरी झाली. आलिशान माेटारीतून अज्ञातांनी हा बकरा लंपास केल्याचे सांगण्यात आले.
सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांनी आपल्या मोदी नावाच्या बकऱ्याची आटपाडीच्या जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये किंमत लावली. त्याला आटपाडीच्या बाजारात ७० लाख रुपये देण्याची तयारी काहींनी दर्शविली हाेती; पण मेटकरी यांनी त्यास नकार दिला. पण अवघ्या सहा महिन्यांचा हाच बकरा तब्बल १६ लाख रुपये देऊन आटपाडीतील सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला. दरामुळे हा बकरा व त्याचे पिलू हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात प्रसिद्ध झाले हाेते.