इस्लामपूर (जि.सांगली) : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील मूकबधिर हसन हकीम हा पूरग्रस्त तरुण प्रशासकीय मदतीच्या अपेक्षेने इस्लामपुरात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या भेटीस धावला. मग त्याने थेट पत्नीला ‘व्हिडीओ कॉल’ केला. पाटील यांनीही त्याच्या हजरजबाबीपणाचे कौतुक करत त्याच्या पत्नीकडून नेमकी समस्या जाणून घेतली. अधिकाऱ्यांना तत्काळ या कुटुंबास मदतीचे आदेश दिले.
रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील हसन हकीम (वय २८) या तरुणाला बोलता येत नाही. मागीलवर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यातील पुरात घरदार उद्ध्वस्त झाले आहे. घरी आई, आजारी वडील, रोजगार करणारा भाऊ आणि शिक्षण घेत असलेली पत्नी असते. हकीम मुंबईत मर्चंट नेव्हीत काम करतो. त्याची पत्नीही कला शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
कुटुंबाची सगळी जबाबदारी हसनवर आहे. ७-८ महिन्यापूर्वी कृष्णा नदी महापुरात त्याचे दोन खोल्यांचे घर भुईसपाट झाले. डोक्यावरचे छतच नियतीने काढून घेतल्याने हसन अस्वस्थ होता. पालकमंत्री पाटील कारखाना कार्यस्थळावर आल्याची माहिती मिळताच हसन सोमवारी दुपारी त्यांना भेटायला आला. मात्र मूकबधिर असल्याने त्याला समस्याच मांडता येईना. मग त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल लावला. राज्य शासनाची ९५ हजार रुपयांची मदत मिळाल्याचे पत्नी रुकसार यांनी सांगितले, मात्र केंद्र शासनाची मदत अद्याप मिळाली नाही, अशी माहिती दिली.