आटपाडी : बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने शाळेला जायला तिला न सायकल होती, ना कोणते वाहन. दररोज तीन किलोमीटर पायपीट करण्याचे कष्ट तिने उपसले. याच कष्टाला कौशल्य बनविण्याच्या कृतीने तिला राज्यस्तरीय चालण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थानी पोहोचविले. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडीच्या आरती काळेची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी बनली आहे.आरती संतोष काळे या शेतकरी कुटुंबातील व कायम दुष्काळी भागातील मुलीने ही किमया करून दाखवली. गोमेवाडी गावठाणापासूनही सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हिवतड रस्त्याला तिचे घर आहे. शेतातच छोट्याशा झोपडीवजा घरात आरतीचे कुटुंब राहते. तिच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावर शाळा असल्याने दररोज तितकी ये-जा तिला करावीच लागते.शिकून मोठे होण्याची ऊर्मी अंगी बाळगल्याने तिने हे कष्ट उपसण्याची मानसिकता केली. साधी सायकल घेण्याइतकीही परिस्थिती नसल्याने या गरीब कुटुंबातील आरती तिच्या बहिणीसमवेत वर्षानुवर्षे कष्टाची वाट चालत राहिली. शाळेतील शिक्षकांना तिच्या या कष्टाची जाणीव होती, पण त्यांनी तिच्या या कष्टाला कौशल्याची जोड देण्याचे काम केले. स्पर्धांमध्ये तिच्या कष्टाचे चीज करण्याची तयारी सुरू झाली.प्रशालेचे क्रीडाशिक्षक घेरडे यांच्या मार्गदर्शनातून ती विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मैदाने गाजवू लागली. चालणे नवे नसल्याने व सरावापेक्षा ते सवयीचे असल्याने बक्षिसांचा प्रवाह त्यांच्याकडे आकर्षित होणे स्वाभाविकच होते. तालुका, जिल्हास्तरावरील मैदाने जिंकत तिने नुकत्याच बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चालण्यात प्रथम क्रमांक मिळविला. यात तिचे वडील संतोष काळे यांचेही मोठे योगदान आहे.
घरी जाऊन केला सत्कारदि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी गोमेवाडी येथे घरी जाऊन आईवडिलांसह आरतीचा सन्मान केला. तिचा हा सत्कार होताना आरतीचे कुटुंबीय भावुक झाले होते.