सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील दूरदर्शन केंद्राजवळ मोटारीत मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाची अखेर ओळख पटली आहे. राजेश्वर प्रकाश भेंडेकर (वय ३५, रा. भेंडेवाडी, ता. गंगाखेड जि. परभणी) असे त्याचे नाव असून, मित्रासमवेत खरेदी केलेली चारचाकी न्यायला तो आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, त्याच्यासोबत असलेला मित्र ज्ञानेश्वर राठोड पसार असल्याने मृत्यूचे कारण समोर आले नसले तरी अतिमद्यप्राशनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
कोल्हापूर रस्त्यावरील दूरदर्शन केंद्राजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मोटारीत (एमएच १२ एएन ६०५९) मृतदेह आढळून आला होता; मात्र तरुण अनोळखी असल्याने नैसर्गिक मृत्यू की घातपात, याबाबत साशंकता होती. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला होता.
अधिक पोलीस तपासात मृत हा परभणी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. राजेश्वर भेंडेकर व त्याचा मित्र राठोड गाडी घेऊन जाण्यासाठी आले होते. जाताना त्यांनी मद्यप्राशन केल्याने रस्त्याकडेला गाडी लावली होती; मात्र मोटारीतच भेंडेकर याचा मृत्यू झाला होता. त्याच्यासोबत असलेला राठोडही तिथे नसल्याने पोलिसांनी तपास केला असता, भेंडेकरच्या अचानक मृत्युमुळे त्याचा मित्र घाबरून निघून गेला असून, तो लवकरच पोलिसात हजर होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अतिमद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता असून, व्हिसेरा पुढील तपासासाठी राखून ठेवण्यात आला आहे.