मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात रात्रीच्यावेळी लुटमारीचे प्रकार सुरू असून, शुक्रवारी रात्री डॉक्टरवर चाकूहल्ला करून ३५ हजारांचा ऐवज लुटला. बसस्थानकाजवळ एसटी वाहकाला मारहाण करून पाच हजाराचा ऐवज काढून घेण्यात आला. याप्रकरणी गांधी चौक व ग्रामीण पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. दगडू बापू काळे (रा. संख, ता. जत) हे शुक्रवारी रात्री अकरा वाजता बेळगावातून रेल्वेने मिरजेत आले. मिरजेतून शिरढोणला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरून मिशन हॉस्पिटल बसथांब्यावर जाण्यासाठी रिक्षात बसले. रिक्षाचालकाने एकट्याला जास्त भाडे लागेल त्याऐवजी आणखी दोघांना घेऊ, असे डॉ. काळे यांना सांगितले. रिक्षात एकजण अगोदरच बसला होता. रिक्षा सुरू झाल्यानंतर आणखी एकजण बसला. रिक्षा मिशन हॉस्पिटलकडे न नेता तो निर्जन रस्त्याने घेऊन गेल्याने डॉ. काळे यांनी रिक्षाचालकास विचारल्यानंतर, त्याने रिक्षात बसलेल्या दोघांना सोडून शॉर्टकटने मिशन हॉस्पिटलला सोडतो, असे सांगितले. रिक्षा बोलवाड रस्त्यावर निर्जन ठिकाणी नेऊन रिक्षात बसलेल्या दोघांनी डॉ. काळे यांचा गळा दाबून धरला.
रिक्षाचालकाने लोखंडी अँगलने डॉ. काळे यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. डॉ. काळे यांनी अॅँगल पकडल्याने रिक्षाचालकाने त्यांच्यावर चाकूहल्ला केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर चाकू लागला.लोखंडी अॅँगल केलेल्या मारहाणीत काळे यांच्या छातीवर मार बसला. बॅगेतील २० हजाराची रोकड, दोन मोबाईल, एटीएम कार्ड, पॅनकार्ड असा ऐवज हिसकावून चोरटे रिक्षातून पसार झाले. याप्रकरणी डॉ. काळे यांनी फिर्याद दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तिघा अज्ञातांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत शुक्रवारी रात्री आठ वाजता मिरज एसटी आगारात वाहक म्हणून काम करणारे विजय दत्तात्रय बागडी यांना शहर बसस्थानकाच्या प्रवेशव्दारासमोर मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम असा ४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी महेबूब रशिद शेख (वय १९, रा. म्हैसाळ, रोड, मिरज) या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याचा साथीदार रियाज शेख ऊर्फ मुर्गी (रा. मिरज) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेबूब शेख यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. रेल्वेस्थानक व बसस्थानक आवारात दररोज रात्री लुटमारीचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांत घबराट आहे.
रिक्षाच्या प्रवासाबद्दल शंकारेल्वे, बसस्थानक येथे रोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. बाहेरील जिल्हा, राज्यातून अनेक प्रवासी येत आहेत. या प्रवाशांच्या मनामध्ये रिक्षातील चोरीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिक्षातील प्रवास सुरक्षित नसल्याची शंका प्रवाशांच्या मनामध्ये येऊ लागली आहे. याबाबत रिक्षा संघटनांनी रिक्षाचालकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे.