लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : बहुजनांचे प्रश्न लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय आटपाडीत झालेल्या ‘रासप’च्या मेळाव्यात घेण्यात आला.
आटपाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजितकुमार पाटील, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष उमाजी चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर आदी प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्ष ही एक चळवळ असून या चळवळीतून अनेक हिरे निर्माण झाले आहेत. ‘रासप’ हा विशिष्ट समाजाचा पक्ष नसून वंचित व उपेक्षित घटकांसह सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी काम करणार पक्ष आहे. राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आजपर्यंत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आंदोलनेही केली आहेत.
यावेळी धनगर समाजासह अन्य समाजातील घटकांच्या न्याय हक्काबाबत लढण्यासाठी येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक बूथ निहाय बूथ कमिटीची स्थापना करून तळागाळातील लोकांपर्यंत रासपाची भूमिका पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर यांचा सत्कार करण्यात आला. माऊली सलगर, उमाजी चव्हाण, अजित पाटील, उमाजी चव्हाण, अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिन व्हनमाणे, सत्यजित गलांडे, समाधान चौगुले, सुहास चौगुले आदी उपस्थित होते.