ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली आहे. मी शेजारील सातारा जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या प्रत्येक हाकेला उभा राहणार आहे. सत्तेतील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यरत आहेत. सरकारमध्ये तिन्ही पक्षांना स्थान असल्याने जिल्ह्यात नियुक्त केल्या जात असलेल्या शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांनाही समान स्थान मिळाले पाहिजे. मात्र, शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. याबाबत जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्री त्यामधून मार्ग काढतील. कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता मी घेईन.
चौकट
कोम्बिंग ऑपरेशन करा
जिल्ह्यातील क्राईम रेटबाबत माहिती नसल्याचे सांगत पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्यातील क्राईम रेटबाबतची माहिती घेतली जाईल. वाढत चाललेल्या घरफोड्या टाळण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि नाईट पेट्रोलिंग वाढविण्याच्या सूचना देऊ. आरोपी जर फरारी असतील तर प्रत्यक्ष आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या जातील, असे देसाई म्हणाले.
चौकट
संचारबंदी कोणाच्या मनाची लहर नव्हे
कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये संचारबंदी लागू केली आहे. तो कोणाच्या मनाची लहर नसल्याचा टोला देसाई यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लगावला. कोरोनाचा वेगळा विषाणू जास्त वेगाने पसरत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
‘शक्ती’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार
महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारने त्याला प्रतिबंध करण्यासाठी ‘शक्ती’ हा कायदा तयार केला आहे. तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल. मंजुरीनंतर शक्ती कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून महिलांवरील अत्याचाराला पायबंद घालण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.