फोटो ओळी : पुजारवाडी-दिघंची येथील रानमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंटची पाईप नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
दिघंची : पुजारवाडी-दिघंची (ता. आटपाडी) येथील रानमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचा लहान कालवा आहे. या रस्त्यावर सिमेंटची पाईप नसल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सिमेंटची पाईप टाकून मिळावी व वाहतुकीस रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी रानमळा येथील युवा कार्यकर्ते सूरज संजय मोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की पांढरेवाडी येथील जोतिर्लिंग दूध केंद्रानजीक कालव्याच्या पाण्याचा पाट आहे. या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून पाणी वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. येथे कालव्याचा खड्डा असल्याने गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक वैतागले आहेत. अनेकवेळा अपघातही घडत आहेत. कालव्याला पाणी आल्यावर एक ते दीड महिना या ठिकाणी पाणी असते. त्यामुळे येथील कालव्यावर सिमेंटची पाईप टाकून मिळावी व वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.
कोट
गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने बऱ्याच वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत. त्याची दखल घेऊन या ठिकाणी सिमेंटची पाईप त्वरित टाकून पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांची सुटका करावी.
- सूरज मोरे