दत्ता यादव।सातारा : गेल्या काही महिन्यांपासून पोवई नाक्यावर ग्रेड सेरपरेटरचे काम सुरू आहे. या खोदकामामुळे नाक्यावरील अनेक इमारती धुळीमुळे पांढºया फिकट दिसू लागल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात धुळीचे थर साचत असतानाही वाहतूक सुरळीत करण्याचे काम होमगार्ड अन् पोलिसांकडून सुरू आहे. धुळीमुळे एक होमगार्ड आणि दोन पोलिसांची प्रकृती बिघडलीय. मात्र, तरीही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
वाढती वाहतूक कोंडी आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी शहराचे मुख्य नाक असलेल्या पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम तितकेच फायद्याचं आणि सोयीचं असलं तरी ग्रेड सेरपरेटचे काम पूर्ण होईपर्यंत अनेकांच्या हृदयाची धडधड कायम वाढत राहणार असल्याचे दिसून येत आहे. खोदकामामुळे प्रचंड प्रमाणात धूळ पसरत आहे.
त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कामानिमित्त पोवई नाक्याकडे जाणारे लोक तोंडाला रुमाल बांधून काही मिनिटांतच तेथून निघून जात आहेत. परंतु ज्यांना पोवई नाक्यावरच ड्यूटी लागली आहे. त्या पोलीस कर्मचाºयांची अवस्था काय असेल याचा विचारही कोणी करणार नाही. तोंडाला रुमाल बांधून आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाºया पोलिसांची प्रकृती आता धुळीमुळे ढासळू लागली आहे.डोळे आणि नाका, तोंडातून धूळ शरीरात गेल्यामुळे अपचन होणे, डोकेदुखी, छातीत आणि डोळ्यांची जळजळ होणे, अशा प्रकारचे आजार वाहतूक पोलिसांना होऊ लागले आहेत. होमगार्ड राजाराम माने, पोलीस कर्मचारी डी. के, जाधव, माने, रा. स. पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांच्या मदतीला होमगार्डही देण्यात आले होते. यातील अनेक होमगार्डसचीही प्रकृती ढासळत असल्याचे समोर आले होते. काहींना ताप, उलटीचा त्रास सुरू झाला होता. परंतु काही दिवसानंतर होमगार्डना तेथून हटविण्यात आले.त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, वाहतूक पोलिसांची यातून सुटका होताना दिसत नाही. या ठिकाणी पोलीस नसेल तर वाहतुकीचे तीन तेरा झालेच म्हणून समजा. त्यामुळे पोलिसाची नेमणूक या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. काही पोलीस कर्मचारी तर तोंडाला कोणतेही सुरक्षिततेचे साधन न बांधता आपले कर्तव्य सांभाळताना दिसून येत आहेत. या पोलिसांना किमान ग्रेड सेपरेटरचे काम होईपर्यंत तरी दर्जेदार मास्क द्यावेत, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रेड सेपरेटरमुळे जेवढा सध्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. तितकेच काहींना फायद्याचेही ठरत आहे. धूळ मोठ्या प्रमाणात परिसरात पसरत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आणि गॉगल विक्रेते पाहायला मिळत आहेत. इतरवेळी त्यांचा दररोजचा व्यवसाय तीनशे रुपये होत असतो. परंतु या ग्रेड सेपरेटरमुळे बाराशे ते दीड हजारांपर्यंत रोजचा व्यवसाय होत आहे, असे विक्रेता धिरज सिंग याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून धिरज रोज सकाळी पोवई नाक्यावर मास्क आणि गॉगल घेऊन विक्रीला येत आहे. सकाळपासून संध्याकाळी सातपर्यंत तो या ठिकाणी थांबत आहे. तसेच या परिसरात लाँड्री व्यवसाय सुद्धा तेजीत सुरू आहे. धुळीमुळे कपडे खराब होत असल्याने रोज नवी कपडे त्या ठिकाणी धुण्यास येत आहेत.आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी हवीपोवई नाक्यावर ड्यूटी बजावणाºया पोलिसांची आठवड्यातून एकदा आरोग्याची तपासणी होणे गरजेचे आहे. अनेक पोलिसांनी धुळीची धास्ती घेतली आहे. परंतु त्यांना कर्तव्य नाकारता येत नसल्याने त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घ्यावी, एवढीच माफक अपेक्षा पोलीस कर्मचाºयांची आहे.
अनेक कुटुंबे स्थलांतरित..पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यामुळे धुळीची अॅलर्जी असणारे लोक तेथून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. काही कुटुंबांनी शाहूनगर, शाहूपुरी या परिसरात वास्तव्य करणे पसंत केले आहे. ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी राहण्यास येणार नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.