सांगली : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रसिध्दी माध्यमांचे दैनिके / इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे प्रतिनिधीही अहोरात्र वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी झटत आहेत. अशावेळी त्यांचीही आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे या भावनेतून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी हेल्थ चेकअप कॅम्पचेआयोजन करण्याबाबत सूचित केले. त्यानुसार पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयसांगली आणि जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींसाठी आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आला.
शासकीय विश्रामगृह विश्रामबाग, सांगली येथे झालेल्या या तपासणी शिबीराचा जवळपास ४० हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी लाभ घेतला. यामध्ये विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे, एफएम वाहिन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. आरोग्य तपासणी प्रसंगी प्रवास, सद्यस्थितीतील शारिरिक तक्रारी, कॉन्टॅक्ट व भूतकाळातील शारिरिक तक्रारीबद्दल सविस्तर विचारपूस करण्यात आली. तसेच रक्तदाब, ताप व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काही लक्षणे दिसतात का याबाबतची तपासणी करण्यात आली.