सांगली : आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियमांचा बडगा उगारल्याने वैद्यकीय अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. मुंडे यांच्या आदेशानुसार काम करायचे, तर आमच्या मानवाधिकारांचाही विचार व्हायला हवा अशी त्यांची भूमिका आहे. २४ तास मुख्यालयात राहण्याची सक्ती असेल, तर त्यासाठी सोयी-सुविधाही देण्याची मागणी केली आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, २४ तास मुख्यालयात राहण्याविषयी शासनाचे आदेश संदीग्ध आहेत. असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. २४ तास सेवेची अपेक्षा असल्यास कामाच्या, विश्रांतीच्या व कौटुंबिक कामकाजांच्या वेळाही निश्चित करुन द्याव्यात.मुंडे यांनी `वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही स्थितीत मुख्यालय सोडायचे नाही` असे फर्मावले आहे. या स्थितीत मुलांच्या चांगले शिक्षणासाठी शाळा, हॉटेल्स, पेट्रोल पंप, बॅंका, गॅस एजन्सी, इतर शासकीय कार्यालये आदी सुविधांची अपेक्षाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.कामाच्या अनिश्चित वेळा आणि अल्प वेतनामुळे नवे डॉक्टर्स शासकीय सेवेत येण्यास तयार नाहीत. सर्व कार्यालयांच्या वेळा निश्चित असल्या, तरी वैद्यकीय सेवेचे अनिश्चित आहेत. सततच्या कामाने शारीरिक व मानसिक क्षमतेवर परिणाम होतील, त्याचे दुष्परिणाम रुग्णाला भोगावे लागू शकतात. या स्थितीत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य केंद्रात २४ तास पोलीसांची नियुक्तीही असावी. २४ तास सेवेसाठी आरोग्य केंद्रांत किमान चार वैद्यकीय अधिकारी द्यावेत.
तब्बल ४४ प्रकारची कामेवैद्यकीय अधिकाऱ्यांना तब्बल ४४ प्रकारची कामे करावी लागतात. लसीकरण, अंगणवाडी तपासणी, साथरोग नियंत्रण, कुटुंब कल्याण शिबिरे, जिल्हा व तालुकास्तरीय आढावा सभा, रुग्ण कल्याण समितीची सभा, आशा आढावा बैठका, कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासाठी कार्यक्षेत्रात फिरती, महिला आरोग्य शिबिरे,आरोग्य पंधरवडे अशी नाना प्रकारची कामे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. याचे वेळापत्रकही मुंडे यांनी निश्चित करुन द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याची सक्ती करताना त्यांच्यासाठी चांगली निवासस्थानेही द्यावीत. नियम व कायद्याचा अंमल व्यवहार्य आहे काय? याचा विचार वरिष्ठांनी करायला हवा. औषधांचा तुटवडा, रिक्त जागा अशा प्रतिकूल स्थितीत कर्मचारी काम करत आहेत.- अरुण खरमाटे, प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना.