सांगली : आरोग्य विभागच्या पेपरफुटीप्रकरणाचे धागेदाेरे आरोग्य संचालनालयापर्यंत पाेहोचले आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री आमदार सदाभाऊ खोत सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अभ्यास केला, मात्र पैसे घेऊन भरती होत असेल तर अभ्यास कशासाठी करायचा. महाविकास आघाडीच्या काळात पैसे द्या आणि नोकऱ्या मिळवा, असे धोरण स्वीकारण्यात आले आहे काय? या प्रकरणाचे धागेदाेरे आरोग्य संचालनालयापर्यंत येत असल्याने राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा. घोटाळा झाला असेल तर तसे जाहीर करावे, अन्यथा चौकशीची प्रक्रिया सुरू करावी.
म्हाडाच्या परीक्षेबाबतही तशीच स्थिती आहे. त्यातला गोंधळही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा राज्य शासनाने रद्द कराव्यात व पुन्हा घ्याव्यात. घोटाळे करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. आम्ही हे प्रकरण शेवटपर्यंत तडीस नेऊ. राज्य शासनाने सध्या परीक्षांचा बाजार मांडला आहे. तो बाजार थांबला नाही तर आम्ही शासनाविरोधात संघर्ष करू.