कुपवाड : महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या उपनगरांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारीनंतर महापौर विवेक कांबळे यांनी कुपवाड शहराला बुधवारी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी स्वच्छतेसारख्या गंभीर प्रश्नामध्ये चालढकल करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. दांडी मारणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा पगारही कापला. स्वच्छतेच्या प्रश्नामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना सुनावले. कुपवाड शहरासह उपनगरांमध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शहर परिसरातील नागरिकांच्या तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी महासभेत महापौरांसमोर मांडला. महापौरांनीही त्याची त्वरित दखल घेऊन बुधवारी शहरातील आरोग्य विभागाला अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. स्वच्छतेबाबतीत हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांना दिला. तीन दांडीबहाद्दरांचा पगारही त्यांनी कापला. या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रवी दामटे, सुनील पवार, श्रीरंग कटले यांचा समावेश आहे. स्वच्छता निरीक्षकांनी आठवड्यातून एकदा नगरसेवकांची भेट घेण्याविषयीचे आदेशही त्यांनी दिले. नागरिक आणि नगरसेवकांमध्ये समन्वय घडविण्यासाठी हे प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शेडजी मोहिते यांनी आरोग्य विभागाला भेडसावणाऱ्या समस्या महापौरांच्या कानावर घातल्या.बैठकीस नगरसेवक शेडजी मोहिते, उद्योजक राजेंद्र जगदाळे, सहायक आयुक्त चंद्रकांत चौधरी, प्रभागाधिकारी कल्लाप्पा हळींगळे, आरोग्य अधिकारी कवठेकर, अस्लम जमादार, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, चवगोंडा कोथळे, दशवंत उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिक त्रस्त : इलेक्ट्रिक मोटारी जप्तीचे आदेशशहर परिसरातील काही नागरिक महापालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या नळ कनेक्शनवर इलेक्ट्रिक मोटारी बसवितात. या मोटारी जप्त करण्याचे आदेश महापौरांनी दिले. त्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने हा आदेश त्यांनी दिला. कुपवाडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पॅचवर्कचे काम खराब झाले असल्यामुळे या कामाची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. संबंधित ठेकेदाराचे बिल थांबविण्याविषयीच्या सूचना दिल्या.
महापौरांकडून आरोग्य कर्मचारी फैलावर
By admin | Published: November 04, 2015 11:21 PM