सांगली : भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार आहे. किमान तापमानाचा आजवरचा २६.४ अंश सेल्सिअसचा विक्रम यंदा मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २९अंशापर्यंत तर कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ९ मे २0१0 मध्ये २६.४ अंश सेल्सिअसची विक्रमी नोंद झाली होती. २0१0 चा अपवाद वगळता कधीही सांगली जिल्ह्याचे किमान तापमान २६ अंशापर्यंत पोहचले नव्हते. रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान २५ अंश नोंदले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी २६ मे रोजी ते २६ अंशावर, २७ मे रोजी २८ अंशावर तर २८ मे रोजी २९ अंशावर जाणार आहे. कमाल तापमानही या आठवड्यात ४२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या इतिहासात ६ मे १९९३ मे रोजी सर्वाधिक कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्या विक्रमाच्या जवळपास यंदाचे तापमान जाणार आहे. मे महिन्यातील सरासरी कमाल तापमानाचा विचार केल्यास रविवारचे तापमान ३ अंशाने तर किमान तापमान २ अंशाने अधिक होते.
उष्णतेची ही लाट नागरिकांसाठी असह्य होण्याची शक्यता आहे. आगामी आठवडाभर जिल्ह्याचे तापमान अंशत: ढगाळ राहणार आहे. यंदाच्या उष्णतेच्या लाटेत कमाल तापमानापेक्षा किमान तापमानाचा आकडा सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. दिवसा उन्हाच्या तीव्र झळा आणि रात्री तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागेल. पुणे वेधशाळेकडून पावसाचा अंदाज
पुणे वेधशाळेने सोमवारी दिलेल्या अहवालानुसार पुणे व आसपासच्या जिल्ह्यात ३0 व ३१ मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून मात्र जिल्ह्याच्या सहा दिवसांच्या हवामान अंदाजात तसा उल्लेख नाही.