फोटो ओळ - संततधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. चरण-सोंडोली पुलावरून टिपलेले वारणा नदीचे छायाचित्र. (छाया - गंगाराम पाटील)
वारणावती : चांदोली धरण परिसरात गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत ८० मिलिमीटर पाऊस झाला.
सलग दुसऱ्यादिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शिवारात पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणातील एक हजार ६०० क्युसेक विसर्ग व ओढ्या-नाल्यांचे पाणी यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे.
चांदोली धरण परिसरातील पाणलोट क्षेत्रात गुरुवारी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक १९ हजार क्युसेक होती; मात्र शुक्रवारी थोडा पाऊस मंदावल्याने पाण्याची आवक १० हजार ६२९ क्युसेक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १५.९० टीएमसी असून, त्यांची टक्केवारी ४६.२२ अशी आहे. धरणातून १ हजार ६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू आहे.
या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगरकपारीतील धबधबे कोसळत आहेत. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. जूनमध्ये सुरू असलेल्या पावसाने पहिल्यांदाच अतिवृष्टीने सलामी दिली. सगळीकडे धुवांधार पाऊस पडत आहे.
चौकट
जूनमध्येच अतिवृष्टी
चांदोली धरण परिसरात पहिल्यांदाच जूनमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यापूर्वी ती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होत होती. ३० जुलै २०१९ ते १३ ऑगस्ट २०१९ अखेर ११ दिवस अतिवृष्टी झाली होती. २९ जुलैला २०१९ मध्ये २३० मिलिमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. ७ जुलै २०२० रोजी १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.