सांगली : सांगली व मिरज शहरात मंगळवारी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. शिराळा, इस्लामपूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस असून, अन्य तालुक्यात शेतकऱ्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात सर्वत्र दिवसभर ढगांची दाटी आहे. त्यामुळे मंगळवारी सूर्यदर्शन होऊ शकले नाही. सांगली, मिरज शहर व परिसरात दुपारी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या सरींमुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून राहिले. अधूनमधून विश्रांती घेत दिवसभर पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यात तसेच इस्लामपूर शहर व परिसरात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. तासगाव, पलूस, कडेगाव, विटा, आटपाडी, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली नाही. दुष्काळी भागात दिवसभर ढगांची दाटी होती; मात्र, पाऊस झाला नाही.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सांगली जिल्ह्यात येत्या ३ जुलैपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे पाणीटंचाईची समस्याही त्यामुळे गंभीर होणार आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सांगलीचे नदीपात्र वारंवार कोरडे पडत आहे. मोठा पाऊस तसेच धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याशिवाय पाणीटंचाईचे ढग हटणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी भागातील नागरिकांनाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.